यूक्रेनच्या (Ukraine) नाटोमधील समावेशाच्या मुद्यावरुन आक्रमक झालेल्या रशियानं (Russia) युद्ध पुकारलं आहे. रशियानं यूक्रेनवर हल्ला करत आता राजधानी किव शहरापर्यंत धडक मारली आहे. रशिया यूक्रेनच्या संघर्षात (Russia Ukraine Crisis) मोठं नुकसान होत असून जीवितहानी देखील होत आहे. या युद्धपरिस्थितीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे हळहळ व्यक्त केली आहे. ‘युद्ध नकोच, बुद्ध हवा’, असं म्हणत या कलाकारांनी शांततेचं आवाहन केलं आहे. अभिजीत केळकर, रसिका सुनील, विजू माने यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘माणुसकीसाठी प्रार्थना करत आहे’, अशी पोस्ट अभिनेत्री रसिका सुनीलने लिहिली आहे. तर ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत केळकरने ‘नको युद्ध, हवा बुद्ध’ अशी पोस्ट लिहिली आहे.
दिग्दर्शक विजू माने यांची पोस्ट-
‘युध्द नकोच बुध्द हवा. मला चांगले ठाऊक आहे, मी माझ्या फेसबुकच्या वॉलवर काही लिहिल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष युद्ध थांबवणार नाहीत. पण ‘युद्ध नको’ ही भावना माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पसरवणे मला महत्त्वाचं वाटतं. आपण एखाद्याच्या आक्रमक विचाराच्या आहारी जाऊन कुठल्याही गोष्टीचं समर्थन करा, पण युद्धाचं कधीच नको. युद्धाने कधीच कोणी जिंकत नसतं,’ अस मत विजू माने यांनी मांडलं आहे.
यूक्रेनची राजधानी किव आणि इतर शहरांवर कब्जा मिळवण्यासाठी रशियाचे प्रयत्न सुरु आहेत. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांना पहिल्या दिवशी तोंड दिल्यानंतर यूक्रेननं देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केलीय. राजधानी किवमध्ये भीषण लढाई होण्याची शक्यता आहे. यूक्रेनकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार सात एअरक्राफ्ट पाडले आहेत. हल्ले प्रतिहल्ल्यांनी कीव हादरुन गेलंय. रशियाचे 800 सैनिक मारले गेल्याचा दावा यूक्रेनकडून करण्यात आलाय. तर, रशियाचे 7 फायटर जेट, 30 टँक आणि 6 हेलिकॉप्टर नष्ट करण्यात आली आहेत.
संबंधित बातम्या: गोळीबार, बॉम्बफेक सुरु असतानाही युक्रेनमध्ये सुरु आहे अभिनेत्याचं काम