“सेटवर तिच्या आठवणीत भावूक व्हायचा अभिषेक..”; दिग्दर्शकाने केला खुलासा

| Updated on: Nov 29, 2024 | 10:27 AM

'आय वाँट टू टॉक' या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सेटवरचा एक किस्सा सांगितला आहे. या चित्रपटात अभिषेक एका पित्याची भूमिका साकारत आहे. एका सीनदरम्यान तो त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीला आठवून भावूक झाला होता.

सेटवर तिच्या आठवणीत भावूक व्हायचा अभिषेक..; दिग्दर्शकाने केला खुलासा
Abhishek Bachchan
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. पत्नी ऐश्वर्या रायसोबत त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. नुकताच त्याचा ‘आय वाँट टू टॉक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्यानिमित्त त्याने एका मुलाखतीत पत्नी ऐश्वर्याचे विशेष आभार मानले. या चित्रपटात अभिषेकने एका पित्याची भूमिका साकारली आहे. ‘पिकू’ फेम दिग्दर्शक शूजित सरकारने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शूजितने शूटिंगदरम्यान अभिषेकचा एक किस्सा सांगितला. एका व्यक्तीच्या आठवणीने सेटवर अनेकदा अभिषेक भावूक व्हायचा, असं शूजितने सांगितलं. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिषेकची मुलगी आराध्या आहे. ऐश्वर्याने 2011 मध्ये आराध्याला जन्म दिला. ती आता 13 वर्षांची झाली आहे.

आरजे सिद्धार्थ कन्ननच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शूजितने शूटिंगदरम्यानचा अशा एका सीनचा किस्सा सांगितला, जेव्हा अभिषेकने दिग्दर्शकांच्या सुचनेशिवायच एका सीनमध्ये स्वत:च्या मनानुसार अभिनय केला होता. “ज्याक्षणी त्याने तो सीन केला, तेव्हा लगेच मी त्याच्याकडे जाऊन त्याला मिठी मारली. मी त्याला म्हणालो की आता तू जे काही केलंस, त्यावरून तू महिलांचा किती आदर करतोस, तिचा (ऑनस्क्रीन मुलगी) किती आदर करतोस हे दिसून येतं. अभिषेकने अप्रतिम काम केलं होतं आणि ते मी त्याला करायला सांगितलंही नव्हतं. त्याने स्वत:च्या मनाने तसा अभिनय केला होता”, असं शूजित म्हणाले.

सेटवरील भावनिक क्षणांबद्दल शूजित यांनी पुढे सांगितलं, “आम्ही सेटवर अनेकदा भावूक झालो होते. कारण अभिषेक स्वत:सुद्धा एक पिता आहे. असे अनेक सीन्स होते, तेव्हा तो भावूक झाला होता. मला मुलगी आहे आणि त्यालाही मुलगी आहे. त्यामुळे ही गोष्ट त्याच्या कामातून दिसून यायची. जेव्हा तो ऑनस्क्रीन पित्याची भूमिका साकारत होता आणि खऱ्या आयुष्यातही तो एक पिता आहे, त्याच्याही घरी एक मुलगी आहे… तेव्हा काही गोष्टींचा संबंध आपोआप जोडला जायचा. हे नातं त्याला समजत होतं आणि काही सीन्सदरम्यान त्याला जणू ती त्याचीच मुलगी वाटायची. मला माहित आहे, कधीकधी त्याला त्या सीन्सचा त्रास व्हायचा, तो भावूक व्हायचा. तो ही गोष्ट मला सांगणार नाही, पण मला नीट ठाऊक आहे.”

हे सुद्धा वाचा

‘आय वाँट टू टॉक’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिषेक आणि शूजितने पहिल्यांदाच एकत्र काम केलंय. शूजित हे ‘सरदार उधम’, ‘ऑक्टोबर’, ‘पिकू’, ‘मद्रास कॅफे’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. या चित्रपटावर समिक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर तो फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटाने थिएटरमध्ये पहिल्या सहा दिवसांत फक्त 1.9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.