मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचं पारडं जड असल्याचं पहायला मिळालं. अभिषेक मल्हान ऊर्फ फुकरा इन्सान आणि एल्विश यादव यांच्या तगडी टक्कर आहे. या दोघांपैकीच कोणीतरी एक यंदाचा सिझन जिंकू शकतो, असा अंदाज नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. अभिषेक आणि एल्विश हे दोघं प्रसिद्ध युट्यूबर्स आहेत. मात्र बिग बॉसमध्ये आल्यानंतर त्यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांमध्ये निर्माण झाली. त्यापैकी अभिषेक हा पहिल्या एपिसोडपासून सर्वांत स्ट्राँग स्पर्धक मानला गेला आहे. तिकीट टू फिनाले जिंकणारा पहिला स्पर्धक तोच ठरला.
युट्यूबवर अभिषेकचा खूप मोठा चाहतावर्ग असून त्याच्या चॅनलचे सध्या 7.43 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. युट्यूबच्या रेव्हेन्यू चार्टनुसार, एखादा युट्यूबर विविध स्रोतांमधून कमाई करू शकतो. त्यापैकीच मुख्य स्रोत म्हणजे अर्थातच जाहिराती. जाहिरातींच्या माध्यमातून त्याला प्रत्येक हजार व्ह्यूजसाठी जवळपास 3 (248 रुपये) ते 5 डॉलर (414 रुपये) मिळतात. याशिवाय तो चॅनल सबस्क्रिप्शन, स्वत:चा ब्रँडेड व्यापार यातूनही कमाई करतो.
अभिषेक मल्हान त्याच्या युट्यूब चॅनलद्वारे दर महिन्याला जवळपास 10 ते 12 लाख रुपये कमावतो. तो संगीतकारसुद्धा आहे. त्याची एकूण संपत्ती दोन कोटी रुपयांच्या घरात असल्याचं कळतंय. बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्यानंतर त्याच्या कमाईत आणखी वाढ झाली आहे. प्रत्येक आठवड्यासाठी त्याला 30 हजार रुपये मानधन मिळत असल्याचं कळतंय.
अभिषेककडे महागड्या गाड्यांचंही कलेक्शन आहे. त्याच्याकडे Jaguar F-Pace ही आलिशान SUV असून त्याची भारतातील किंमत जवळपास 77.41 लाख रुपयांपासून सुरू होते. याशिवाय अभिषेककडे Maruti Suzuki Ciaz आहे, ज्याची किंमत सुमारे 9.30 लाख ते 12.45 लाख रुपयांदरम्यान आहे. त्याचसोबत Tata Harrier ही गाडीसुद्धा त्याच्या कलेक्शनमध्ये असून त्याची किंमत जवळपास 15.20 लाख ते 24.27 लाख रुपये इतकी आहे.