अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मुंबईतील प्रभादेवी परिसरात असल्याची माहिती समोर येत आहे. सैफवर हल्ला केल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. तो ट्रेनने वांद्र्याला आला होता. सैफच्या इमारतीची सुरक्षा भिंत कमी उंचीची असल्याने त्याला सहज तिथून पळून जाता आलं. आरोपीचं शेवटचं लोकेशन प्रभादेवी असल्याचं कळतंय. याठिकाणी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. सैफवर हल्ला करणारी व्यक्ती ही रात्रभर त्याच्या घरात दबा धरून बसली होती. रात्री दोन वाजता त्याच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सुरू असल्याचा आवाज सैफला आला. हा आवाज ऐकून सैफ त्याच्या रुमबाहेर आला, तेव्हा चोराने त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोर हा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का? तो आत कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता का? याचा पोलीस तपास करत आहेत.
आरोपीने सैफवर चाकूने सहा वार केले. या हल्ल्यात सैफच्या मणक्यालाही जबर दुखापत झाली. या घटनेनंतर सैफला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्यावर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी केली असून मणक्यातून अडीच इंचाचा चाकूचा तुकडाही काढला. लिलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमणी यांनी याबाबतची माहिती दिली.
चाकूहल्ल्यानंतर सैफचा मोठा मुलगा इब्राहिम अली खानने त्याला सर्वांत आधी रुग्णालयात दाखल केलं. 23 वर्षीय इब्राहिम हा सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंहचा मुलगा आहे. तो सैफ आणि करीनासोबत राहत नसला तरी हल्ल्याबद्दल समजताच त्याने धाव घेतली आणि वडिलांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.
#WATCH | Karisma Kapoor leaves from Bandra’s Lilavati Hospital, where Saif Ali Khan is admitted following an attack on him
As per the hospital, the actor out of danger and recovering well. pic.twitter.com/XhKL91kagC
— ANI (@ANI) January 16, 2025
याप्रकरणी सैफची पत्नी करीना कपूरकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. करीनाच्या टीमने म्हटलंय, ‘गेल्या रात्री सैफ अली खान आणि करीना कपूरच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. सैफच्या हाताला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर कुटुंबीय ठीक आहेत. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना संयम राखण्याची विनंती करतो. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू असल्याने मीडिया किंवा चाहत्यांनी याप्रकरणी कोणतेच अंदाज वर्तवू नयेत. तुम्ही सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल धन्यवाद.’
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही या घटनेबाबत महत्त्वाचा खुलासा केला. सैफच्या घरात शिरलेला चोर हा लिफ्ट किंवा इमारतीच्या मुख्य लॉबीमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला नाही. त्यामुळे इमारतीच्या शाफ्टमधून तो चोर बारा मजले चढून गेला असावा, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.