बेंगळुरूमध्ये एका बर्थडे पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात आलं. पार्टीनंतर सोमवारी पोलिसांनी एका फार्म हाऊसवर छापा टाकला. या फार्म हाऊसमध्ये उपस्थित असलेल्या 86 लोकांची ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह आली. यामध्ये एका तेलुगू अभिनेत्रीचाही समावेश आहे. अभिनेत्री हेमानेही त्या पार्टीत ड्रग्जचं सेवन केलं होतं आणि तिच्या चाचणीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याची माहिती बेंगळुरू पोलिसांनी दिली आहे. ज्यादिवशी पोलिसांनी फार्महाऊसवर छापा टाकला, त्याचदिवशी हेमाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत पार्टीला उपस्थित नसल्याचं म्हटलं होतं. मात्र पोलिसांनी त्याविरोधीच माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 आणि 20 मे रोजी मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच बरीच लोकं सहभागी झाली होती. एका व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र पोलिसांना त्या पार्टीत ड्रग्जचं सेवन केलं जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी फार्महाऊसवर छापा टाकला. हेमाने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितलं की ती या पार्टीला उपस्थित नव्हती. मात्र पोलिसांनी तिचं हे स्पष्टीकरण चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर हेमाच्या बेंगळुरूच्या फ्लाइटची तिकिट पुरावा म्हणून असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
రేవ్ పార్టీలో తాను ఉన్నట్లు వస్తున్న వార్తలను ఖండించిన నటి హేమ
బెంగళూరులో జరిగిన రేవ్ పార్టీలో నేను లేను.. నేను హైదరాబాద్లోనే ఫామ్ హౌస్లో ఎంజాయ్ చేస్తున్నా. బెంగళూరు రేవ్ పార్టీతో నాకు సంబంధం లేదు – నటి హేమ#Tollywood #RaveParty #Bangalore #Actress #Hema #ActressHema… pic.twitter.com/Wibo416DNK
— Aadhan Telugu (@AadhanTelugu) May 20, 2024
वासूच्या वाढदिवसाची पार्टी असल्याचं सांगत ही रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती आणि त्यात 100 हून अधिक लोक सहभागी झाले होते. याप्रकरणी 19 मे रोजी एफआयआर दाखल करण्यात आली. केंद्रीय गुन्हे शाखेनं याप्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला आहे. याप्रकरणी नोटीस जारी करणार असून ड्रग्जच्या चाचणीत ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, त्यांना समन्स बजावण्यात येणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 86 लोकांनी ड्रग्जचं सेवन केल्याचं आढळून आलं होतं. त्यात अभिनेत्री हेमाचाही समावेश आहे.
सोमवारी हेमाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत आपली बाजू मांडली. ड्रग्ज प्रकरणात विनाकारण माझं नाव गोवलं जातंय, असा आरोप तिने या व्हिडीओत केला होता. “मी कुठेच गेली नव्हती. मी हैदराबादमधील माझ्या फार्महाऊसमध्ये आराम करत होते. कृपया माझ्याबद्दल अफवा पसरवू नका. मी त्या रेव्ह पार्टीमध्ये होती, अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे. तिथे कोण होतं, मला माहीत नाही”, असं तिने स्पष्ट केलं. हेमा ही तेलुगू अभिनेत्री असून तिचं खरं नाव कृष्णा वाणी आहे. अभिनेत्रीसोबतच ती कॉमेडियन असून जवळपास 250 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय.