तमिळनाडूमधील तेलुगू भाषिक लोकांबद्दल वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्री कस्तुरी शंकरला रविवारी चेन्नई इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर तिला 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. चेन्नई पोलिसांनी 16 नोव्हेंबर रोजी तिला हैदराबादमध्ये अटक केली. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला. कस्तुरीची टिप्पणी अनावश्यक असल्याचं न्यायालयाने नमूद केलं होतं. आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कस्तुरी तिच्या चेन्नईतील घरातून गायब झाली होती. तिने तिचा मोबाइल फोनही बंद ठेवला होता. पोलीस तिचा शोध घेत होते.
वादानंतर कस्तुरीने तिच्या वक्तव्यावरून माघार घेत माफी मागितली होती. मात्र तोपर्यंत तिच्याविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या होत्या. चेन्नई पोलिसांच्या पथकाने तिचा शोध घेतला असला हैदराबादमधील एका चित्रपट निर्मात्याच्या घरी ती सापडली आणि तिथूनच तिला अटक करण्यात आली. त्यानंतर चैन्नईमध्ये आणून एग्मोर इथल्या दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केलं असता तिला 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर तिची रवानगी पुझल मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
‘इंडियन’ आणि ‘अन्नमय्या’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली 50 वर्षीय अभिनेत्री कस्तुरी शंकरनं तेलुगू लोकांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. तमिळनाडूतील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना ती म्हणाली, “तेलुगू लोक प्राचीन काळात राजांची सेवा करणाऱ्या वेश्यांचे वंशज आहेत.”
कस्तुरीचा अटकपूर्व जामीन फेटाळणारे न्यायमूर्ती एन. आनंद व्यंकटेश म्हणाले, “याचिकाकर्तीचं भाषण स्पष्टपणे द्वेषयुक्त भाषण आहे. आपल्यासारख्या वैविध्यपूर्ण देशात जेव्हा विशिष्ट गटाच्या लोकांना त्यांच्या भाषेच्या आधारवरून अपमानित करून असं भाषण केलं जातं, तेव्हा त्याच्याप्रती शून्य सहनशीलता असणं आवश्यक आहे.” कस्तुरीने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत 15 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय. आपल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर तिने दावा केला की तिची मतं काही विशिष्ट व्यक्तींबद्दल होती, ती व्यापक तेलुगू समुदायासाठी नव्हती. डीएमकेकडून या मुद्द्याला वेगळं वळण दिलं जात असल्याचा आरोप तिने केला.
“माझ्या व्यापक तेलुगू समुदायाला दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. तरीही मी दिलगिरी व्यक्त करते. मी माझ्या भाषणातील तेलुगूचे सर्व संदर्भ मागे घेत आहे”, अशा शब्दांत कस्तुरीने माफी मागितली. मात्र आधी अपमानास्पद वक्तव्ये करणं आणि नंतर परिणामांपासून वाचण्यासाठी माफी मागणं सहन केलं जाऊ शकत नाही अशा शब्दांत न्यायमूर्ती व्यंकटेश यांनी खडसावलं. तमिळनाडूमधील काही घटक तेलुगू समुदायाविरोधात आवाज उठवणारे म्हणून ओळखले जातात. अलीकडेच तमिळनाडूमधील तेलुगू संघटनांनी ‘नाम तमिलार कच्ची सुप्रीमो सीमान’ यांच्या भाषिक अल्पसंख्याकांविरोधात कथित फूट पाडणाऱ्या भाषणाबद्दल कारवाईची मागणी केली होती.