मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीत असे काही दमदार अभिनेते आहेत, ज्यांनी करिअरमध्ये मोजक्याच भूमिका साकारल्या पण त्यातूनही प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. मात्र या कलाकारांना नशिबाची तेवढी साथ मिळाली नाही. बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्याची कथा अशीच काहीशी आहे. नव्वदच्या दशकात या अभिनेत्याची लोकप्रियता तुफान होती. आपल्या दमदार लूक्स आणि अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र एका मोठ्या अपघाताने त्या अभिनेत्याचं संपूर्ण आयुष्यच बदललं. या अपघातानंतर त्याला तब्बल आठ वर्षांचा ब्रेक घ्यावा लागला आणि एवढ्या मोठ्या ब्रेकनंतर इंडस्ट्रीत पुनरागमन करणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्याला ओळखलंत का?
हा अभिनेता आहे ‘माचिस’, ‘जोश’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला चंद्रचूड सिंह. अभिनयासोबतच त्याच्या लूक आणि व्यक्तीमत्त्वाच्या प्रेमात असंख्य तरुणी होत्या. आजही अनेक वर्षांनंतर जेव्हा पापाराझींनी त्याचा एअरपोर्टवरील व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला, तेव्हा चाहत्यांकडून भरभरून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. चंद्रचूडच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, अभिनयात करिअर करण्यासाठी त्याने युपीएससी परीक्षेची तयारी सोडली होती. मात्र जेव्हा तो करिअरमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचला, तेव्हाच मोठ्या अपघाताने त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं.
2000 त्याचा भीषण अपघात झाला आणि त्यामुळेच त्याचं बॉलिवूडमधील करिअर संपुष्टात आलं होतं. गोव्यात जेट स्कीईंग करताना त्याचा तोल सुटला. त्याचवेळी त्याची स्पीड बोट वेगाने पुढे जात असताना चंद्रचूडच्या उजव्या हाताला जबर मार लागला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात त्याचा हात पूर्णपणे धडापासून वेगळा झाला असता. पण दैव बलवत्तर म्हणून चंद्रचूडसोबत असं काही घडलं नाही. मात्र त्यानंतर त्याला आठ वर्षांचा ब्रेक घ्यावा लागला होता.
नुकतंच चंद्रचूडला मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. ‘हा अभिनेता आठवतोय का’, असं कॅप्शन लिहित एका पापाराझी अकाऊंटवर चंद्रचूडचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. त्यावर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता. ‘आठवतंय का, म्हणजे काय? ज्यांनी कोणी आर्या पाहिला असेल त्यांना समजेल की सुष्मिता सेनपेक्षा या अभिनेत्याला पाहण्याची उत्सुकता अधिक होती’, असं एकाने लिहिलं होतं. तर ‘आमदनी अठ्ठनी खर्चा रुपय्या’ या चित्रपटाचं नाव लिहित अनेकांनी त्याचं कौतुक केलं. ‘चांगल्या कलाकारांना कोणीच विसरू शकत नाही’, असंही दुसऱ्या युजरने म्हटलं होतं.