उत्तरप्रदेश: भोजपुरी अभिनेता पवन सिंहची पत्नी ज्योती सिंहने त्याच्याविरोधात मानसिक छळाचा आरोप केला आहे. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली आहे. पवनने मला गर्भपात करण्यास भाग पाडलं आणि आत्महत्येस प्रवृत्त केलं, असे गंभीर आरोप ज्योतीने केले आहेत. बलिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस प्रवीण कुमार सिंह यांनी रविवारी याबद्दलची माहिती दिली. ज्योती सिंह यांची तक्रार आली असून या प्रकरणाचा तपास करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी अद्याप पवन सिंहने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
ज्योती सिंहने त्यांच्या तक्रारीत म्हटलंय की, 6 मार्च 2018 रोजी त्यांचं पवनशी लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांनी पवन, त्याची आई प्रतिमा देवी आणि बहिणीने त्यांना त्यांच्या दिसण्यावरून टोमणे मारण्यास सुरुवात केली. मामाकडून मिळालेले 50 लाख रुपये सासूने घेतल्याचा आरोपही तिने केला आहे.
विविध प्रकारे अत्याचार करण्यासोबतच त्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचंही ज्योतीने म्हटलंय. ज्योतीच्या तक्रारीनुसार, ती गरोदर असताना त्यांनी तिला औषध दिलं, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. दारूच्या नशेत पतीने शिवीगाळ आणि मारहाण केल्याचंही तिने सांगितलंय.
पवनने मर्सिडीज कारची मागणी केल्याचं ज्योतीने तिच्या तक्रारीत म्हटलंय. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ती पुढे म्हणाली, “माझ्याकडे सर्व तक्रारींबाबतचे पुरावे आहेत. योग्य वेळी मी ते सर्वांसमोर आणेन.”
22 एप्रिल रोजी ज्योतीने कौटुंबिक न्यायालयात पवनविरोधात दावा दाखल केला होता, ज्यावर न्यायालयाने पवनला नोटीस बजावली होती. 5 नोव्हेंबर रोजी सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
36 वर्षीय पवन हा प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता आहे. 2014 मध्ये ‘लॉलीपॉप लागेलू’ या गाण्याने त्याला प्रसिद्धी मिळाली. यापूर्वी 2014 मध्ये पवनने नीलमशी लग्न केलं होतं. मात्र नीलमने लग्नाच्या एका वर्षानंतर आत्महत्या केली होती.