मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : ‘गडकरी’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. यापूर्वी या चित्रपटाचं पोस्टर, टीझर प्रदर्शित झाल्यानंतर नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार या प्रश्नाच्या उत्तराची प्रेक्षकांना प्रतीक्षा होती. आता या चित्रपटाचं दुसरं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून यातील ‘गडकरी’ यांचा चेहरा समोर आला आहे. नितीन गडकरी यांची भूमिका अभिनेता राहुल चोपडा साकारणार आहेत. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे.
या व्यतिरिक्त या चित्रपटात नितीन गडकरी यांच्या मित्रांच्या भूमिकेत अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख आहेत. तर पत्रकाराची भूमिका तृप्ती प्रमिला केळकर हिने साकारली आहे. अनुराग राजन भुसारी दिग्दर्शित ‘गडकरी’ हा चित्रपट येत्या 27 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘गडकरी’ या चित्रपटाची कथा, पटकथाही अनुराग राजन भुसारी यांची असून अनुराग भुसारी, मिहिर फाटे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग राजन भुसारी म्हणाले, ” हा चित्रपट अशा एका व्यक्तिमत्वावर आधारित आहे, ज्याचं कर्तृत्व केवळ भारतापुरताच मर्यादित नसून त्याची दखल भारताबाहेरही घेण्यात आली आहे. असं व्यक्तिमत्व कसं घडलं, हे ‘गडकरी’मधून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. मुळात त्यांच्या रक्तातच समाजसेवा होती, तरी त्यांच्या या कारकिर्दीत त्यांच्या मित्रांचा आणि त्यांच्या अर्धांगिनीचा तितकाच सहभाग होता. कलाकारांच्या निवडीबद्दल सांगायचं तर राहुल चोपडा या भूमिकेत चपखल बसतात. त्यांची देहबोली, संयमी स्वभाव, कठोर तरीही प्रसंगी हळवं मन या विविध छटा राहुल चोपडा यांनी उत्तम साकारल्या आहेत. तर समंजस, खंबीरपणे पतीच्या पाठीमागे उभ्या राहणाऱ्या कांचनताईही ऐश्वर्या यांनी सुरेख साकारली आहे. यातील प्रत्येक पात्र जसेच्या तसे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”
नितीन गडकरी त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच एक प्रगतशील भारत नावारूपास आला. या चित्रपटाच्या टीझरची सुरुवातच ”या देशाची ओळख जेव्हा त्याच्या रस्त्याने होईल, तेव्हा मी आनंदाने म्हणू शकेन मी नितीन जयराम गडकरी…” या संवादाने होते. त्यामुळे त्यांची बांधिलकी ही केवळ राजकारणाशी नसून समाजकारणाशीही आहे, याचा प्रत्यय येतो. टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.