आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री आणि अँकर अपर्णा वस्तारे यांचे गुरुवारी निधन झालंय. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कर्करोगा झाला होता. अपर्णा यांनी नम्मा मेट्रोमध्ये कन्नड भाषेत आवाज दिला होते. त्यामुळे त्यांचा आवाज ही चाहत्यांसाठी खूप खास होता. अपर्णा या बंगळुरूमध्ये मोठ्या झाल्या. त्यांचे वडील कन्नड प्रकाशनाचे चित्रपट पत्रकार होते. अपर्णा यांना संगीत, साहित्य आणि संस्कृतीची आवड होती. 1985 मध्ये त्यांनी कन्नड चित्रपटातून पदार्पण केले होते. 1990 च्या दशकात अपर्णा यांनी ऑल इंडिया रेडिओसोबत रेडिओ जॉकी आणि डीडी चंदनावर अँकर म्हणून काम केले. नंतर त्यांनी काही मालिकांमध्ये ही काम केले.
अपर्णा यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी त्यांच्या जाण्याने मोठा धक्का बसल्याचं म्हटले आहे. पद्मजाने डीएचला सांगितले, ‘आम्ही एक वर्ष भेटू शकलो नाही. मला आज शोकही करता येत नाहीये.’ कन्नड भाषेवर प्रभुत्व असलेली अँकर म्हणून अपर्णा यांची ओळख होती. त्यांना जेवणाचीही खूप आवड होती. अपर्णा काही दिवसांपासून अस्वस्थ होत्या, त्यांचं वजन देखील कमी झाले होते. त्या अशक्त दिसत होत्या.
अपर्णा यांच्या पश्चात त्यांचे पती नागराज वस्तारे आहेत. पत्रकारांशी बोलताना नागराज म्हणाले की, अपर्णा फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त होती, जो दोन वर्षांपूर्वी जुलैमध्ये आम्हाला कळाला. ती कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर होती.
प्रस्तुतकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अनेक सरकारी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणारी अभिनेत्री तसेच अँकर यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. 1998 मध्ये त्यांनी दिवाळीच्या उत्सवात सलग आठ तास कार्यक्रम सादर करून विक्रम केला होता.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक चित्रपट, दूरदर्शन, साहित्यिक आणि राजकीय व्यक्तींनी अपर्णा वस्तारे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. सिद्धरामय्या यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘अभिनेत्री आणि प्रसिद्ध निवेदिका अपर्णा यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. एक अष्टपैलू प्रतिभा, जी राज्यातील घराघरात नावाजलेली व्यक्ती आणि आघाडीच्या कन्नड चॅनेल्स आणि सरकारी कार्यक्रमांवर कन्नड भाषेत तिच्या सुंदर सादरीकरणासाठी ओळखली जात होती, ती खूप लवकर आम्हाला सोडून गेली.’