मुंबई | मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी.. प्राजक्ता माळी हिने अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. फार लहान – लहान भूमिका साकारत अभिनेत्रीने झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान भक्कम केलं. करियरच्या सुरुवातीस मराठमोळ्या प्रजक्ता माळी हिने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केली. खुद्द अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने शाहरुख खान याच्यासोबत कोणत्या सिनेमात स्क्रिन शेअर केली… याबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वत्र सोशल मीडियावर अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जक्ता माळी म्हणाली, ‘स्वदेस नावाचा एक सिनेमा आहे. सिनेमातील एका सीनमध्ये अभिनेत्री एका लायब्ररीमध्ये पैसे विसरते आणि तो (शाहरुख खान) तिचे पैसे देण्यासाठी बाहेर येतो. बाहेर येत असताना शाहरुख दोन मुलींना धडकतो. त्या दोन मुलींमध्ये एक मी आहे..’ असं म्हणत अभिनेत्री शाहरुख खान याच्यासोबत असलेल्या आठवणी ताज्या केल्या..
अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकारांसोबत काम करण्याचं प्रत्येक नव्या कलाकारचं स्वप्न असतं. अभिनय क्षेत्रात सुरुवातीच्या काळात शाहरुख खान याच्यासोबत काम करता आल्यामुळे प्राजक्ता प्रचंड आनंदी होती.
अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर प्राजक्ता माळी हिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. पण ‘रानबाजार’ वेब सीरिजमध्ये प्राजक्ताने साकारलेल्या भूमिकेला अनेकांनी विरोध केला, अनेकांनी मात्र अभिनेत्रीची कौतुकाने पाठ थोपटली. ‘रानबाजार’ सीरिजमध्ये प्राजक्ताने रत्ना ही व्यक्तीरेखा साकारली होती.
‘रानबाजार’मध्ये रत्ना ही भूमिका साकारल्यामुळे प्राजक्ता तुफान चर्चेत आली होती. सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्रीला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. रत्ना ही भूमिका साकारताना तू गुटखा खायचीस का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्राजक्ताने स्पष्टीकरण दिलं होतं. रत्ना ही भूमिका साकारताना गुटखा नाही तर त्या पुडीत बडीशेप असल्याचं प्राजक्ता हिने सांगितलं होतं.
प्राजक्ता माळी हिने ‘हंपी’, ‘चंद्रमुखी’, ‘लॉकडाऊन’, ‘पावनखिंड’, ‘खोखो’, ‘पांडू’, यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर प्राजक्ताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील प्राजक्ताच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.