Rashmika Mandanna : अटल सेतू वरील व्हिडीओनंतर रश्मिका मंदाना तूफान ट्रोल, चाहते नाराज

| Updated on: May 18, 2024 | 9:33 AM

रश्मिका मंदाना हिने अटल सेतूवर शूट केलेल्या व्हिडीओवरून वाद निर्माण झाला आहे. त्या व्हिडिओवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रियाही दिली. मात्र तिचा हा व्हिडीओ लोकांना फारसा आवडलेला नाही आणि अनेकांनी तिला खडेबोल सुनावलेत.

Rashmika Mandanna : अटल सेतू वरील व्हिडीओनंतर रश्मिका मंदाना तूफान ट्रोल, चाहते नाराज
Image Credit source: social media
Follow us on

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने अटल सेतूवर केलेल्या व्हिडीओनंतर राजकीय वातावरण भलतंच तापलं असून अनेक लोकं तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. रश्मिकाच्या या व्हिडीओमुळे तिचा राजकीय कल उघड झाला आहे, मात्र त्यामुळे बरेच लोक संतापले आहेत आणि रश्मिकाला सोशल मीडियावर झापत आहेत , तिच्यावर टीका करत आहेत. मात्र एक वर्ग असाही आहे, जो तिचं कौतुक करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्यावर तर वाद चांगलाच पेटला आहे.

काय आहे त्या व्हिडीओत ?

रश्मिकाने हा व्हिडीओ ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये रश्मिका ही अटल सेतूचं कौतुक करताना थकत नाहीये. ‘ माझ्याकडे नव्हे बाहेर पहा, काय दिसतंयं. जर तुम्ही पूल बघत असाल तर डोळे नीट उघडा. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा भारतातील सर्वात मोठा सागरी पूल आहे. 6 लेन असलेला हा 22 किलोमीटर लांबीचा पूल आहे. यामुळे दोन तासांचा प्रवास अवघ्या 22 मिनिटांत पूर्ण होतो. विश्वास बसत नाही ना. असे घडेल याची काही वर्षांपूर्वी कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं’ असं म्हणत रश्मिकाने या अटल सेतूच्या कौतुकाचे पूल बांधलेत.

एवढंच नव्हे तर पुढे या व्हिडीओमध्ये रश्मिकाने मोदी सरकारचे समर्थ करत म्हटले , ‘ ही ठकठक त्या बंद दारावर आहे, जे म्हणायचे की भारत मोठे स्वप्न पाहू शकत नाही. पण आम्ही ते अवघ्या 7 वर्षात पूर्ण केले. अटल सेतूने भविष्याची दारं इतकी जोरदार ठोठावली आहेत की विकसित भारताचा मार्ग खुला झाला आहे. हा केवळ पूल नाही, तर आपल्या नव्या भारताचा आत्मविश्वास आहे. आता आपल्या देशाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असे शेकडो अटल पूल बांधायचे आहेत. जागे व्हा आणि विकासाला मतदान करा ‘ असे आवाहन तिने या व्हिडीओतून केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रश्मिका मंदान्नाचा व्हिडिओ लाइक केला आहे. ‘ लोकांना जोडणं आणि त्यांचं जीवन चांगलं बनवणं यापेक्षा समाधानकारक काहीही नाही,’ असे त्यांनी व्हिडिओ शेअर करत लिहीलं.

 

रश्मिकाचे चाहते झाले नाराज

मात्र रश्मिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे तिचे चाहते नाराज झाले असून तिच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. नॅशनल क्रश असलेली (रश्मिका) ही राष्ट्रवादी आहे. ती म्हणत्ये विकासाला मतदान कर, पण त्यामुळे चमचे भडकत आहेत, असे एका युजरने लिहीलं. तर दुसऱ्या युजरनेही कमेंट केली आहे. ‘ॲनिमलसारखा चित्रपट कर, आम्ही तो पाहू आणि हिट करू. पण अशा जाहिराती करू नकोस’ असे त्याने म्हटले. ‘ प्रिय रश्मिका, पुल आणि पुतळ्यांसह, मणिपूर हिंसाचारावरही तुमची जाहिरात पाहायला आवडेल. मणिपूरला उर्वरित भारताशी जोडूया?’ अशी कमेंट तिसऱ्या युजरने केली.

 

रश्मिकाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह

आणखी युजर्सनीही रश्मिकाला खडेबोल सुनावलेत. आधी मणिपूरला जाऊन ये, असं एकाने तिला सुनावलं. तर या जाहिरातीसाठी चांगलं पेमेंट मिळालं असेल ना असा खोचक सवाल एकाने विचारला. एवढंच नव्हे तर काही लोकांनी तिच्यावर वैयक्तिक टीकाही केली. ‘2020 साली रश्मिकाच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला होता आणि आता तुम्ही रश्मिका पाहताय की रश्मिका ही सरकारचे कौतुक करत्ये’ असे म्हणत एका युजरनेतिच्यावर टीकास्त्र सोडलं. एकंदरच रश्मिकाची ही जाहिरात लोकांना फारशी आवडलेली नाही, असं दिसतंय.