अमेरिका : हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शेरॉन स्टोन तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. शेरॉननं तिच्या आयुष्यातील अनुभवांवर ‘द ब्युटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस’ हे पुस्तक लिहिलं आहे. यामध्ये तिने वैवाहिक आयुष्यापासून ते हॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत अनेक धक्कादायक अनुभव लिहिले आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेरॉनने असा काही खुलासा केला आहे, ज्याबद्दल ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेसिक इन्स्टिंक्ट’ या चित्रपटातील एका न्यूड सीनमुळे तिला तिच्या मुलाचा ताबा मिळाला नव्हता. या न्यूड सीनमुळे शेरॉन रातोरात प्रकाशझोतात आली होती. मात्र तो अत्यंत बोल्ड सीन तिला न सांगताच शूट करण्यात आला होता, असाही दावा तिने केला.
एका पॉडकास्टमध्ये बोलताना शेरॉन म्हणाली, “माझ्या मुलाचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात माझ्याविरोधात माझ्या चित्रपटातील न्यूड सीनचा वापर करण्यात आला होता. न्यायाधीशांनी माझ्या लहान मुलाला विचारलं होतं, ‘तुझी आई सेक्स फिल्म्स बनवते हे तुला माहितीये का?’ न्यायव्यवस्थेकडून अशा पद्धतीची वागणूक देण्यात आली होती. चित्रपटातील त्या एका भूमिकेमुळे मी कशा पद्धतीची आई आहे, असा विचार करण्यात आला होता.”
शेरॉन आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती फिल ब्रॉनस्टीन यांनी 2004 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तर 2000 मध्ये त्यांनी एका मुलाला दत्तक घेतलं होतं. रोआन असं त्या मुलाचं नाव आहे. ‘बेसिक इन्स्टिंक्ट’मधील न्यूड सीनमुळे मी माझ्या मुलाचा ताबा गमावला होता. “आजकाल लोक टीव्हीवर विवस्त्र दिसतात आणि त्यावेळी मी काही सेकंदांच्या सीनमुळे माझ्या मुलाचा ताबा गमावला”, असं ती पुढे म्हणाली.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी तो न्यूड सीन शेरॉनच्या परवानगीशिवाय शूट केल्याचा आरोप तिने केला. इतकंच नव्हे तर 1993 मध्ये एका पुरस्कार सोहळ्यादरम्यानही तिचा अपमान करण्यात आल्याचं शेरॉनने सांगितलं. ‘बेसिक इन्स्टिंक्ट’ या चित्रपटाला पुरस्कार देण्यासाठी जेव्हा तिचं नाव देण्यात आलं होतं, तेव्हा लोक हसू लागले होते. अभिनेता मायकलसोबतचा तिचा हा चित्रपट त्यावेळी हिट ठरला होता. या चित्रपटाने 300 मिलियन डॉलरपेक्षा अधिक कमाई केली होती. त्यावेळी हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.