मुंबई: इंडस्ट्रीत स्टार बनण्याचं स्वप्न घेऊन दररोज असंख्य कलाकार बॉलिवूडची वाट धरतात. यापैकी काही कलाकारांचं स्वप्न पूर्ण होतं. तर काहींचं अपूर्ण राहतं. याला काही अपवाद म्हणजे काही कलाकारांना प्रसिद्धी आणि लोकप्रियता तर मिळते, मात्र काही कारणास्तव ती तेवढ्या वेळेपुरतीच राहते. अभिनेत्री तल्लुरी रामेश्वरी अशाच कलाकारांपैकी एक आहे. अनेकांना आता हे नाव फारसं माहीत नसेल. मात्र एकेकाळी ही बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री होती.
तल्लुरी रामेश्वरी ही 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सावळा रंग असूनही रामेश्वरीने सिनेविश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची ओळख बनवली. ‘दुल्हन वही जो पिया मन भाए’ या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार बनली. या चित्रपटानंतर त्यांना अनेक मोठमोठ्या निर्मात्यांकडून ऑफर्स येऊ लागल्या होत्या. एका चित्रपटात भूमिका साकारून रामेश्वरी यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.
‘दुल्हन वही जो पिया मन भाए’ या चित्रपटानंतर रामेश्वरी यांनी मागे वळून पाहिलं नाही. मान अभिमान आणि अग्निपरीक्षा यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम काम केलं. याशिवाय त्यांना ‘आशा’ या चित्रपटामुळेही ओळखलं जातं. दमदार अभिनयकौशल्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. हिंदी सिनेसृष्टीत आपली छाप सोडल्यानंतर त्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
तल्लुरी रामेश्वरी या अल्पावधीच सुपरस्टार बनल्या होत्या. त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची सर्वत्र चर्चा होती. यशाचा हा आलेख असाच चढता राहील अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही. यशाच्या शिखरावर असताना रामेश्वरी यांच्या आयुष्यात अत्यंत वाईट वळण आलं. त्या घोड्यावरून पडल्या आणि त्यांच्या डोळ्याला खूप मार लागला.
घटनेनंतर डॉक्टरांनी त्यांना सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. ज्यासाठी नऊ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार होती. रामेश्वरी सर्जरीसाठी न्यूयॉर्कला गेल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांचं आयुष्यच बदललं. त्या कालावधीत बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांची जागा दुसऱ्या अभिनेत्रींनी घेतली. ज्या अभिनेत्रींनी त्यांची जागा घेतली, त्यापैकी बरेच जण यशस्वी झाल्याचंही म्हटलं जातं.
करिअरमध्ये आलेल्या या चढउतारांदरम्यान रामेश्वरी यांनी क्लासमेट आणि पंजाबी अभिनेता-निर्माता दीपक सेठ यांच्याशी लग्न केलं. आता रामेश्वरी बिझनेसवुमन झाल्या आहेत. माहेश्वरी सेठ स्कीन केअर स्टार्ट अप बिझनेसचं त्या पाहतात. दीपक आणि रामेश्वरी यांना दोन मुलं आहेत.