मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे तिच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला मिळणारा दमदार प्रतिसाद. देशभरात या चित्रपटावरून वाद सुरू असतानाही ‘द केरळ स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाने कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. एकीकडे सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा असताना आता अदा शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चे काही फोटो पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर बऱ्याच जखमा झालेल्या दिसत आहेत.
अदाने पोस्ट केलेले हे फोटो चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे आहेत. लडाखच्या पर्वतांमध्ये ‘द केरळ स्टोरी’च्या काही सीन्सचं शूटिंग झालं होतं. त्यावेळी -16 डिग्री तापमानात चित्रपटाच्या टीमने शूटिंग पूर्ण केलं होतं. अदाने पोस्ट केलेले हे फोटो म्हणजे ‘द केरळ स्टोरी’ची पडद्यामागीत दृश्ये आहेत. ‘बिफोर अँड आफ्टर’ (आधी आणि नंतर) असे दोन्ही फोटो तिने पोस्ट केले आहेत. ‘अशा फाटलेल्या ओठांमागील गुपित म्हणजे -16 डिग्री तापमानात 40 तासांपर्यंत डिहायड्रेटेड रहावं लागलं होतं. गुडघे आणि हातांच्या कोपऱ्यांना मार लागला होता. पण या सर्व कष्टाचं चीज झालं’, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
यासोबतच तिने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे चित्रपटातील तिचा एक चांगला लूक पहायला मिळतोय. केसांना तेल लावून, दोन वेण्या बांधलेल्या लूकमध्ये अदा फारच सुंदर दिसतेय. अशाप्रकारे तिने शूटिंगदरम्यान आणि त्यानंतरची झलक या फोटोंमधून दाखवली आहे.
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा, सिद्धी इदनानी, योगिता बिहानी आणि सोनिया बलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल याठिकाणी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं धर्मांतर केल्यानंतर त्यांना कथित ISIS दहशतवादी संघटनेत सामील करून घेतलं गेलं, अशी कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट ‘इस्लामोफोबिक’ असल्याची टीका होत आहे.
चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाबद्दल अदा शर्मा एका मुलाखतीत म्हणाली होती, “मला वाटत नाही की जगातील कोणताही धर्म किंवा संत तुम्हाला असं करण्यास सांगणार नाही जे मानवतेला हानिकारक असेल. दुसऱ्याचा जीव घेणाऱ्या लोकांमध्ये काहीतरी चुकीचं नक्कीच असेल. मी खुश आहे की मी अशा देशात राहते, जिथे मला माझी मतं मांडण्याचं स्वातंत्र्य आणि भाषणस्वातंत्र्य आहे. मतस्वातंत्र्य असल्याबद्दल तुमचा कोणी इथे शिरच्छेद करत नाही. मी लिपस्टिक लावू शकते आणि त्यामुळे माझे हात कापले जात नाहीत. माझी फक्त एकच विनंती आहे की लोकांनी आधी हा चित्रपट पहावा आणि त्यानंतर मत मांडावं. याचीही माझ्या देशात परवानगी आहे.”