मुंबई : ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पाहिल्यानंतर रामायण कसं दाखवू नये याचं उदाहरण सादर केल्याची टीका अनेकांनी सोशल मीडियावर केली. या चित्रपटातील व्हिएफएक्स, कलाकारांचा वेश आणि त्यांच्या तोंडी असलेले संवाद यावरून निर्माते-दिग्दर्शक आणि लेखकाला प्रचंड ट्रोल केलं जातंय. याच ट्रोलिंगनंतर अखेर त्यातील काही डायलॉग्स बदलणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिपुरुषमधील काही डायलॉग्स प्रेक्षकांना खटकले असून त्यावरून सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. हे डायलॉग्स नेमके कोणते आहेत, ते पाहुयात..
चित्रपटातील एका सीनमध्ये रावणाचा मुलगा इंद्रजीत हा बजरंग बलीच्या शेपटीला आग लावतो. त्यावेळी तो म्हणतो, “जली ना? अब और जलेगी.. बेचारा जिसकी जलती है, वही जानता है”
सोशल मीडियावरील प्रचंड ट्रोलिंगनंतर अखेर या चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटातील वादग्रस्त डायलॉग्स बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. टी-सीरिजच्या अधिकृत प्रवक्त्याने याबाबतची माहिती दिली आहे. त्याचसोबत संवादलेखक मनोज मुंतशीर यांनीदेखील ट्विट करत डायलॉग्स बदलणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘मी आणि चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांनी ठरवलंय की जे संवाद तुम्हाला खटकले आहेत, त्याविषयी आम्ही अभ्यास करू आणि या आठवड्यात सुधारित संवाद चित्रपटात समाविष्ट करू’, असं त्यांनी म्हटलंय. मात्र याच ट्विटमध्ये त्यांनी टीकाकारांवर नाराजी व्यक्त केली आहे.