मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून देशभरात आणि परदेशातही वाद सुरू आहे. याच वादाचा आणि नकारात्मक प्रतिक्रियांचा फटका या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर कलेक्शनवर बसला आहे. ‘आदिपुरुष’ची ॲडव्हान्स बुकिंग जबरदस्त झाली होती. त्यामुळे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात 140 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. मात्र आता हळूहळू कमाईच्या आकड्यात घट होताना दिसतेय. चित्रपटाच्या विरोधाचा परिणाम चौथ्या दिवसाच्या कमाईत स्पष्ट पहायला मिळाला.
‘आदिपुरुष’ने पहिल्या दिवशी देशभरात 86.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवसाची कमाई 100 कोटी रुपये इतकी झाली होती. तिसऱ्या दिवशी कमाईत थोडी घट झाली. हा आकडा 65 कोटींपर्यंत पोहोचला. त्यानंतर आता चौथ्या दिवशी कमाईच्या आकड्यात तिप्पट घट झाली. ‘आदिपुरुष’ने सोमवारी फक्त 20 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या नकारात्मक रिव्ह्यूचा फटका कमाईला बसतोय, हे स्पष्ट झालं आहे.
THE NEGATIVE WORD OF MOUTH HAS COME INTO PLAY…
After a strong opening weekend, #Adipurush COLLAPSES on Monday.#Hindi version. #India biz. pic.twitter.com/HJT4hHT80u— taran adarsh (@taran_adarsh) June 19, 2023
केवळ भारतातच नाही तर परदेशातही या चित्रपटावरून वाद सुरू आहे. काठमांडूमध्ये आदिपुरुषच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. सीतेबद्दलच्या एका डायलॉगवरून तिथल्या महापौरांनी आक्षेप घेतला आहे. त्यानंतर आता चित्रपटाचे निर्माते टी-सीरिज यांच्याकडून महापौर बालेंद्र शाह यांना माफीनामा पाठवण्यात आला आहे.
रामायण कसं दाखवू नये याचं मूर्तिमंत उदाहरण ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळाल्याची टीका अनेकांनी केली आहे. 500 कोटी खर्च करून केजीएफच्या खाणीसारखी काळी कुट्ट लंका, मायावी राक्षसांचा चित्रविचित्र लूक, ड्रॅगनसदृश प्राणी, मुन्नाभाईसारखा चालणारा रावण, इतर कलाकारांचं हास्यास्पद चित्रीकरण अशा अनेक गोष्टींवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे.
आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सैफ अली खानने लंकेश आणि सनी सिंहने शेषची (लक्ष्मण) भूमिका साकारली आहे. या चित्रपटात देवदत्त नागे, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे अशा मराठी कलाकारांच्याही भूमिका आहेत.