मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावर सर्व बाजूंनी टीका होत आहे. रामायण या महाकाव्यावर आधारित असलेला हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. मात्र या बिग बजेट चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच निराशा केली. यातील कलाकारांचा लूक, VFX आणि डायलॉगवरून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग सुरू आहे. तर दुसरीकडे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप काही संघटनांकडून केला जातोय. काही ठिकाणी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली जातेय. या सर्व वादादरम्यान आता अभिनेत्री क्रिती सनॉनने शेअर केलेला व्हिडिओ नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.
आदिपुरुष या चित्रपटात अभिनेता प्रभासने राघव (राम), क्रिती सनॉन जानकी (सीता), सनी सिंहने शेष (लक्ष्मण), सैफ अली खानने लंकेश (रावण) आणि देवदत्त नागेनं बजरंग बलीची (हनुमान) भूमिका साकारली आहे. क्रितीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर थिएटरमधील काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘टाळ्यांचा कडकडाट आणि प्रोत्साहन यावर लक्ष केंद्रित करत आहे. जय श्री राम!’ तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
‘काळजी करू नका मित्रांनो, ही सर्व त्यांचीच माणसं आहेत,’ असं एकाने लिहिलं आहे. तर ‘नीट ऐक, त्या टाळ्या नाहीत तर तक्रारी आहेत.’ ‘तू हे स्वीकार कर की हा चित्रपट बनवणं म्हणजे मोठी चूक आहे. रामायणावर आधारित सर्वात वाईट चित्रपट हा आहे,’ असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. असा चित्रपट बनवण्यासाठी दिग्दर्शक आणि लेखकावर बंदी आणली पाहिजे, अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये मोठा वाद सुरू आहे. 19 जूनपासून काठमांडूमध्ये आदिपुरुषसह सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी लागू करण्यात आली आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात सीतेचा उल्लेख ‘भारत की बेटी’ म्हणून केल्याने हा वाद सुरू झाला आहे. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनी काठमांडू महानगर क्षेत्रातील सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्याला पाठिंबा दिला आहे. ‘आदिपुरुष’मधील तो संवाद न काढता चित्रपट प्रदर्शित केल्यास कधीच भरून न निघणारं नुकसान होईल, असं ते म्हणाले.