मुंबई- ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाचा वाद अजूनही शमला नाही. रामायणाच्या (Ramayan) कथेवर आधारित असल्याच्या या चित्रपटातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जातोय. त्याचप्रमाणे आदिपुरुषचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील VFX आणि रावणाच्या लूकवरूनही ट्रोलिंग झालं. इतकंच नव्हे तर राजकीय पक्षांनीही या वादात उडी घेतली. आदिपुरुष या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपने घेतली. त्यानंतर आता पुन्हा एकदा दिग्दर्शक ओम राऊतने (Om Raut) वादावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी चित्रपटात अपेक्षित बदल करण्याचे संकेत दिले.
‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत ओम राऊतने चित्रपटाला मिळत असलेल्या नकारात्मक प्रतिक्रियांवर भाष्य केलं. “आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही प्रेक्षकांनाच प्राधान्य देणार. त्यामुळे जो काही फिडबॅक आम्हाला मिळतोय, त्याची आम्ही नोंद करून ठेवतोय”, असं तो म्हणाला.
“आम्हाला ज्या काही सूचना आणि प्रतिक्रिया मिळत आहेत, त्या सर्वांची आम्ही नोंद करून ठेवतोय. हा चित्रपट जेव्हा 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होईल, तेव्हा कोणीच निराश होणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे”, असंही तो पुढे म्हणाला.
आदिपुरुष चित्रपटात काही बदल करणार का असा प्रश्न विचारला असता ओम राऊतने सांगितलं, “आता लोकांनी फक्त 95 सेकंदांचा टीझरच पाहिला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही त्या सर्व गोष्टींची नोंद करून ठेवतोय. प्रेक्षकांना अजिबात निराशा होणार नाही. ”
या चित्रपटात अभिनेता प्रभासने राम, सैफ अली खानने रावण आणि क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. टीझर पाहिल्यानंतर या भूमिकांबद्दल प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रावण हा अल्लाउद्दीन खिल्जीसारखा दिसतोय, अशी तक्रार नेटकऱ्यांनी केली.