मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी जगभरात प्रदर्शित झाला. यामध्ये प्रभास, क्रिती सनॉन, सनी सिंग, सैफ अली खान, देवदत्त नागे यांच्या भूमिका आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या बिग बजेट चित्रपटाचं काम सुरू होतं. मात्र प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. या चित्रपटातील व्हीएफएक्स, कलाकारांचा लूक आणि डायलॉग्सवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. यामध्ये ‘बाहुबली’ फेम प्रभासने राघव (प्रभू श्रीराम) यांची भूमिका साकारली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक ओम राऊत यांनी प्रभासलाच श्रीरामाच्या भूमिकेसाठी का निवडलं, यामागचं कारण सांगितलं.
रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सैफ अली खानने लंकेश, सनी सिंहने शेष (लक्ष्म्ण) आणि देवदत्त नागेनं बजरंगची भूमिका साकारली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ओम राऊत म्हणाले, “राघवच्या भूमिकेसाठी प्रभास ही माझी एकमेव निवड होती. तुम्ही जर आदिपुरुष पाहिला असेल, तर तो आताच्या पिढीसाठी बनवण्यात आल्याचं तुम्हाला दिसेल. तरुणाईसाठी हा चित्रपट बनवला आहे. संपूर्ण रामायण मोठ्या पडद्यावर दाखवणं खूप कठीण आहे. पण तुम्ही ते संपूर्ण श्रद्धेनं आणि समजूतदारपणे मांडू शकता. रामायणातील काही भाग फक्त मी चित्रपटात दाखवला आहे.”
“प्रभास या भूमिकेसाठी उत्तम पर्याय आहे, कारण त्याचं हृदय फार स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे तुमचे डोळे हे तुमच्या हृदयाचे प्रतिबिंब असतात. प्रभासच्या डोळ्यांमध्ये तुम्ही प्रामाणिकपणा सहज पाहू शकता. इतका मोठा स्टार असूनही तो अत्यंत विनम्र स्वभावाचा आहे. त्यामुळे आदिपुरुषमधील राघव यांच्या भूमिकेसाठी मी फक्त त्याचाच विचार करू शकलो”, असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं. मात्र या भूमिकेसाठी प्रभासचा होकार मिळवणं तेवढं सोपं नव्हतं.
“प्रभासकडून भूमिकेसाठी होकार मिळवणं सोपं नव्हतं, कारण कोरोना महामारीदरम्यान मी त्याच्याशी फोनवर बोललो होतो. चित्रपटातील भूमिकेविषयी त्याने विचारलं तेव्हा मी राघव या भूमिकेचा खुलासा केला. त्यावर तो म्हणाला, तुम्हाला खात्री आहे का, की मी ती साकारू शकेन? मी हो म्हटल्यानंतर आम्ही झूम कॉलवर बोललो. एवढ्या मोठ्या स्टारला मी झूम कॉलवर चित्रपटाची कथा सांगितली”, असं ओम राऊत म्हणाले.
कोरोना महामारीदरम्यान ओम राऊत यांनी एका वैमानिकाचा बंदोबस्त केला. त्याच्या मदतीने ते मुंबईहून हैदराबादला गेले. तिथे प्रभासला चित्रपटाची संपूर्ण कथा समजावून सांगितल्यानंतर त्याच दिवशी ते परत मुंबईला आले.