मुंबई- रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच त्यावरून जोरदार वाद सुरू झाला. या चित्रपटात अभिनेता प्रभासने राम, सैफ अली खानने रावण आणि क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. टीझर पाहिल्यानंतर या भूमिकांबद्दल प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रावण हा अल्लाउद्दीन खिल्जीसारखा दिसतोय, अशी तक्रार नेटकऱ्यांनी केली. आता राजकीय पक्षांनीसुद्धा या वादात उडी घेतली आहे. भाजपच्या राम कदम यांनी चित्रपटाला तीव्र विरोध केला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसे (MNS) पक्षानं दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांची बाजू घेतली आहे.
“95 सेकंदांचा टीझर येतो आणि त्यानंतर जोरदार टीका होते, हे चुकीचं आहे. तुम्ही कोणी हा चित्रपट पाहिलाय का? आधी चित्रपट तर प्रदर्शित होऊ द्या. पुढच्या पिढीला चित्रपटातून पौराणिक गोष्टी तरी कळतील. राम कदमांना चित्रपट कळत असेल तर त्यांनी चित्रपट बनवावा. एखादा चित्रपट बनवताना मोठी मेहनत लागते. नव्या पिढीला वेगळ्या पद्धतीने रामायण बघू द्या. रावण कसा होता, हे बघायला तुम्ही गेला होता का”, असा सवाल मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला.
दिग्दर्शक ओम राऊत यांची बाजू घेत ते पुढे म्हणाले, “मी हा चित्रपट नक्की पाहीन. ओम राऊत यांनी तान्हाजी, लोकमान्य यांसारखे चित्रपट बनवलेत. ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत. ते असं करणार नाहीत. त्यांच्या क्रिएटिव्हीटीमध्ये जाऊ नका. त्यांना त्यांचं काम करू द्या. तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी एखाद्या दिग्दर्शकाला त्रास देऊ नका.”
भाजपचे राम कदम यांनी ट्विट करत आदिपुरुष चित्रपटाला विरोध केला. ‘आम्ही हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. फक्त पब्लिसिटीसाठी या चित्रपटात देव-देवतांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे कोट्यवधी हिंदुंच्या भावना दुखावल्या जात आहे. केवळ चित्रपटातून दृश्ये हटवून चालणार नाही. अशा विचारांच्या लोकांना धडा शिकवणं गरजेचं आहे’, असं ते म्हणाले.