मुंबई : रामनवमीनिमित्त ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या बहुचर्चित चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा पोस्टर शेअर केला आहे. यामध्ये रामाच्या भूमिकेत प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती सनॉन आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंग दिसून येतोय. राम-सीता आणि लक्ष्मण यांच्यासमोर नतमस्तक झालेले हनुमानही या पोस्टरमध्ये पहायला मिळत आहेत. अभिनेता देवदत्ता नागेनं हनुमानाची भूमिका साकारली आहे. ‘आदिपुरुष’च्या टीझर आणि ट्रेलरवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर दिग्दर्शकांनी बदल करण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. मात्र आता या नव्या पोस्टरवरही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘मंत्रों से बढके तेरा नाम, जय श्री राम’, असं कॅप्शन देत प्रभासने हा पोस्टर शेअर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘कलाकारांवर कोणताच राग नाही, कारण त्यांची काही चूक नाही. पण हा पोस्टरसुद्धा मनाला भावत नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘प्रभासने हा प्रोजेक्ट सोडून द्यावा’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘संस्कृती मस्करी का करताय’, असा संतप्त सवालही नेटकऱ्यांनी केला आहे. आदिपुरुषच्या पोस्टरचं एडिटिंग नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही. त्यावरूनच अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
आदिपुरुष हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. टीझरमधील VFX वरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली होती. त्यानंतर चित्रपटाच्या टीमने व्हिएफएक्सवर आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे येत्या 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये प्रभास, क्रिती सनॉन, सनी सिंग, सैफ अली खान यांच्या भूमिका आहेत.
‘जय श्री राम, आदिपुरुष हा केवळ चित्रपट नाही तर प्रभू श्री राम यांच्याप्रती असलेली आमची श्रद्धा आणि आपल्या संस्कृती, इतिहासाप्रती असलेली वचनबद्धता आहे. प्रेक्षकांना चित्रपटाचा चांगला अनुभव देता यावा यासाठी आम्हाला चित्रपटावर आणखी काम करण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. देशाला अभिमान वाटेल असा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. तुमचं प्रेम, तुमची साथ मिळाली तर यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. आदिपुरुष आता 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे’, असं ट्विट ओम राऊतने केलं होतं.