नालासोपारा : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटावरून मोठा वाद सुरू झाला आहे. रामायण या महाकाव्यापासून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवल्याची प्रतिक्रिया लेखक मनोज मुंतशीर यांनी दिली. मात्र त्यातील कलाकारांच्या तोंडी असलेले डायलॉग हे अत्यंत ‘टपोरी’ भाषेतील असल्याची टीका नेटकरी करत आहेत. रामायणासारख्या महाकाव्यातील पात्रांना दिलेला लूक, व्हीएफक्स आणि डायलॉग्सवरून सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू आहे. या चित्रपटातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप काही हिंदू संघटनांनी केला आहे. याच कारणामुळे रविवारी (18 जून) नालासोपाऱ्यातील मल्टिप्लेक्समध्ये हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी ‘आदिपुरुष’च्या स्क्रिनिंगदरम्यान गोंधळ घातला.
कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये राडा घालून आदिपुरुषचं स्क्रिनिंग बंद पाडलं आणि घोषणाबाजी केली. यावेळी मल्टिप्लेकचे कर्मचारी आणि कार्यकर्ते यांच्याच शाब्दिक बाचाबाचीसुद्धा झाली. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ‘आदिपुरुष’मधील डायलॉग्सवर अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर अखेर निर्मात्यांनी ते संवाद बदलणार असल्याचं जाहीर केलं. आठवडाभरात चित्रपटातील संवाद बदलले जातील, अशी माहिती देण्यात आली.
#WATCH | Maharashtra | Members of a few Hindu organisations created a ruckus at a multiplex in Nalasopara, Palghar on Sunday, 18th June while the film #Adipurush was being screened there. The protesters stopped the screening of the film, raised slogans and entered into a verbal… pic.twitter.com/b7BBDKPigm
— ANI (@ANI) June 19, 2023
आजपासून (19 जून) काठमांडूमध्ये सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी लागू करण्यात आली आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात सीतेचा उल्लेख ‘भारत की बेटी’ म्हणून केल्याने हा वाद सुरू झाला आहे. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनी काठमांडू महानगर क्षेत्रातील सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्याला पाठिंबा दिला आहे. ‘आदिपुरुष’मधील तो संवाद न काढता चित्रपट प्रदर्शित केल्यास कधीच भरून न निघणारं नुकसान होईल, असं ते म्हणाले. ‘जानकी भारत की बेटी है’ हा संवाद अद्याप चित्रपटात तसाच असल्यामुळे आजपासून काठमांडूमध्ये सर्व हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.
पहिल्या दिवशी आदिपुरुष या चित्रपटाचा जगभरातील कमाईचा आकडा तब्बल 140 कोटी रुपये इतके होता. पहिल्या वीकेंडच्या परीक्षेतही हा चित्रपट पास झाला असून आतापर्यंत कमाईचा 300 कोटींचा आकडा पार केला आहे.