मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रामायणाच्या कथेवर आधारित या चित्रपटात अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सैफ अली खानने लंकेश आणि सनी सिंहने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेले प्रेक्षक त्यातील काही भूमिका पाहून थक्क झाले आहेत. आदिपुरुषमधील शूर्पणखेच्या भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला आहे. या भूमिकेसाठी ओम राऊत यांनी एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची निवड केली आहे. शूर्पणखेच्या भूमिकेत या मराठी अभिनेत्रीला पाहून प्रेक्षकसुद्धा थक्क झाले आहेत.
ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून तेजस्विनी पंडित आहे. तेजस्विनी पंडितने ‘आदिपुरुष’ या ऐतिहासिक चित्रपटात शूर्पणखाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तेजस्विनीसोबतच आणखी एक मराठी कलाकार आहे, तो म्हणजे देवदत्त नागे. देवदत्त नागेनं यामध्ये बजरंग बलीची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरमध्येही त्याचा लूक पहायला मिळाला होता. मात्र तेजस्विनी पंडितची भूमिका प्रदर्शनापूर्वी कुठेच जाहीर करण्यात आली नव्हती. तिच्या भूमिकेबद्दल निर्मात्यांनी कमालिची गुप्तता पाळली होती. विशेष म्हणजे कोणत्याही प्रमोशनच्या कार्यक्रमातही तिला पाहिलं गेलं नव्हतं.
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा पहिला शो पाहिल्यानंतर ट्विटरवर प्रेक्षकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. हा चित्रपट त्यांना कसा वाटला, याविषयी प्रेक्षक ट्विट करत आहेत. जवळपास 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वांत महागडा मानला जातोय. पहिल्या शोनंतर या चित्रपटाला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. राघवच्या भूमिकेतील प्रभासचं अभिनय चाहत्यांना आवडलं असून पार्श्वसंगीताचं कौतुक अनेकांनी केलं आहे. तर काहींनी ओम राऊतच्या चित्रपटावर कमकुवत व्हीएफएक्स आणि सैफ अली खानच्या भूमिकेवरून टीका केली आहे.
गेल्या वर्षी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. मात्र व्हिएफएक्स आणि कलाकारांच्या लूकवरून नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडला. ‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांचे लूक पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. टीझरमधील रावणाच्या लूकवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. सैफ अली खानच्या दाढीची तुलना नेटकऱ्यांनी मुघलांशी केली होती. हा वाद नंतर इतका वाढला की निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली होती.