मुंबई : प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंह राजपूतचं सोमवारी निधन झालं. मुंबईतील अंधेरी इथल्या राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला. वयाच्या 32 व्या वर्षी आदित्यने अखेरचा श्वास घेतला. अद्याप आदित्यच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आदित्यने मॉडेलिंगपासून करिअरला सुरुवात केली होती. त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं होतं. ‘क्रांतिवीर’, ‘मैंने गांधी को नहीं मारा’ या चित्रपटांसह एमटीव्ही या वाहिनीवरील ‘स्पिल्ट्सविला’ या रिअॅलिटी शोमध्येही आदित्य सहभागी झाला होता. आदित्यच्या निधनाच्या वृत्ताने टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. निधनाच्या एक दिवस आधीच त्याने मित्रांसोबत पार्टी केली होती.
आदित्य सोशल मीडियावर बराच सक्रिय असायचा. विविध फोटो आणि व्हिडीओ तो चाहत्यांसोबत शेअर करायचा. सोशल मीडियावरील त्याचे पोस्ट पाहून आदित्य हा अत्यंत आनंदी व्यक्तीमत्त्वाचा होता, असं दिसून येतं. त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यात तो आनंदाविषयी बोलताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. यात तो म्हणतोय की, पैसे गरजेचे असतात पण आनंद हा सर्वांत जास्त गरजेचा असतो. आईच्या हातचं जेवण जेवण्यात आनंद आहे, आपल्या पाळीव प्राण्यासोबत खेळण्यात आनंद आहे, असं तो म्हणतो. रोजच्या जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा, याबाबत तो व्हिडीओत बोलताना दिसतोय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्य त्याच्या 11 व्या मजल्यावरील राहत्या घरात वॉशरुममध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या जवळच्या मित्राने सर्वांत आधी त्याला पाहिलं होतं आणि त्यानेच आदित्यला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचाराआधीच आदित्यचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. आदित्यच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्याचं निधन झाल्याचीही चर्चा आहे. त्याच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे.
आदित्यचा जन्म दिल्लीत झाला आणि तिथेच तो लहानाचा मोठा झाला. त्याचे कुटुंबीय उत्तराखंडचे आहेत. आदित्यने दिल्लीतील ग्रीन फील्ड्स स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने रॅम्प मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. 25 हून अधिक जाहिरातींमध्ये तो झळकला होता. काही जाहिरातींमध्ये त्याने हृतिक रोशन आणि क्रिकेटर सौरव गांगुलीसोबत स्क्रीन शेअर केलं होतं. दिल्लीहून मुंबईला आल्यानंतर त्याने ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. त्याने बऱ्याच रिॲलिटी शोजमध्ये भाग घेतला होता.