मुंबई : अभिनेता आदित्य सिंह राजपूतच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मुंबईतल्या अंधेरी इथल्या राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळला. 32 वर्षीय आदित्यच्या मृत्यूप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. त्याचं निधन नेमकं कोणत्या कारणामुळे झालं, असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाला असं काही रिपोर्ट्स म्हणतायत. तर बाथरुममध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज काहींनी वर्तवला आहे. आदित्यच्या निधनाचं नेमकं कारण त्याच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईलच. मात्र त्यापूर्वी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आदित्यची प्रकृती ठीक नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरीणीने पोलिसांना सांगितलं की आदित्यला गेल्या काही दिवसांपासून खोकला, ताप आणि उल्ट्या होत होत्या. तब्येत बरी नसतानाही त्याने रविवारी मित्रांसोबत पार्टी केली होती. या पार्टीमध्ये त्याने काही सेवन केलं होतं का, याबाबतची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून स्पष्ट होईल.
मोलकरीणीने नोंदवलेल्या जबाबानुसार, आदित्य सोमवारी सकाळी 11 वाजता उठला आणि नाश्त्यात त्याने पराठा खाल्ला. त्यानंतर त्याला सतत उल्ट्या होत होत्या. म्हणून त्याने त्याच्या कुकला खिचडी बनवण्यास सांगितलं. दुपारी 2 ते 2.30 वाजताच्या सुमारास तो बाथरुममध्ये गेला. त्यानंतर नोकराला जोरात पडल्याचा आवाज ऐकू आला. बाथरुमकडे धाव घेतली असता आदित्य जमिनीवर पडलेला दिसले आणि त्याला किरकोळ दुखापतसुद्धा झाली होती.
आदितच्या हाऊसहेल्पने ताबडतोब धाव घेत वॉचमनची मदत मागितली. त्यानंतर वॉचमन घरी पोहोचला आणि त्याने आदित्यला उचललं. तोपर्यंत तो बेशुद्ध झाला होता आणि वॉचमनच्या मदतीने मोलकरीणीने आदित्यला बेडवर झोपवलं. वॉचमनने दिलेल्या माहितीनुसार बाथरुममधील टाइल्ससुद्धा तुटल्या होत्या. त्यानंतर जवळच्या रुग्णालयातील एका डॉक्टरांना बोलावलं गेलं. डॉक्टरांनी आदित्यला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. या सर्व घडामोडींनंतर आदित्यच्या एका मैत्रिणीला आणि पोलिसांना याबद्दलची माहिती देण्यात आली.
आदित्यला आधी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला जोगेश्वरी इथल्या ट्रॉमा केअर रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्याठिकाणी आदित्यला मृत घोषित करण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
आदित्यचा जन्म दिल्लीत झाला आणि तिथेच तो लहानाचा मोठा झाला. त्याचे कुटुंबीय उत्तराखंडचे आहेत. आदित्यने दिल्लीतील ग्रीन फील्ड्स स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने रॅम्प मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. 25 हून अधिक जाहिरातींमध्ये तो झळकला होता. काही जाहिरातींमध्ये त्याने हृतिक रोशन आणि क्रिकेटर सौरव गांगुलीसोबत स्क्रीन शेअर केलं होतं. दिल्लीहून मुंबईला आल्यानंतर त्याने ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. त्याने बऱ्याच रिॲलिटी शोजमध्ये भाग घेतला होता.