मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर सतत दबाव टाकून त्यांना टोकाचं पाऊल उचलण्यासाठी भाग पाडणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि नितीन देसाई यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा कुटुंबीयांची आहे. नितीन देसाई आणि त्यांची पत्नी नेहा देसाई यांनी 2004 मध्ये एनडी स्टुडिओच्या रचनेला सुरुवात केली होती. हा संपूर्ण भव्यदिव्य स्टुडिओ उभारायला त्यांना तब्बल चार वर्षे लागली. एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीअंतर्गत एनडी स्टुडिओ उभारण्यात आला होता.
नितीन देसाई आणि पत्नी नेहा देसाई हे दोघं कंपनीचे संचालक होते. मात्र स्टुडिओचं संपूर्ण कामकाज नितीन स्वत: पाहायचे. त्यांच्या निधनानंतर आता ही जबाबदारी त्यांच्या पत्नीच्या खांद्यावर आहे. एनडी स्टुडिओमध्ये जवळपास 50 हून अधिक स्टाफ काम करतो. या स्टाफशिवाय अनेक फ्रिलान्सरसुद्धा नितीन देसाई यांच्यासोबत त्यांच्या आर्ट असाइनमेंटमध्ये काम करायचे.
टेक्निकल टीम आणि ऑफिस स्टाफशिवाय स्टुडिओमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट, सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि इतर लोकसुद्धा काम करतात. कोरोना काळात शूटिंग बंद पडल्यानंतरही नितीन देसाई यांनी त्यांच्या टीमची साथ सोडली नव्हती. स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून त्यांनी सहकाऱ्यांची मदत केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर आता एनडी स्टुडिओवर लिलावाचं संकट घोंघावतंय. मात्र त्यांच्या कुटुंबीयांना आशा आहे की त्यांना न्याय नक्कीच मिळेल.
‘टीव्ही 9 हिंदी’ या वेबसाइटशी बोलताना देसाई कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी सांगितलं की नितीन यांच्या निधनानंतर आता संपूर्ण जबाबदारी नेहा यांच्यावर आली आहे. त्यांनी मुलगी मानसी देसाई आईला पूर्ण मदत करतेय. मात्र जोपर्यंत एनडी स्टुडिओशी संबंधीत कायदेशीर प्रकरण सोडवलं जात नाही, तोपर्यंत स्टुडिओमध्ये शूटिंग करता येणार नाही.
नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी एडलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष रशेष शहा आणि एडलवाईज ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राज कुमार बन्सल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.