मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री छवी मित्तलला गेल्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. शस्त्रक्रिया आणि रेडिओथेरेपीनंतर तिने यशस्वीरित्या कॅन्सरवर मात केली. आजारपणातही सकारात्मक दृष्टीकोन ठेवणारी छवी अनेकांनी प्रेरणा ठरली. मात्र आता तिला एका नव्या आजाराने ग्रासलं आहे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे तिने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. कॉस्टोकॉन्ड्राइटिस (costocondritis) असं तिने आजाराचं नाव सांगितलं आहे. छातीतील कार्टिलेजला झालेल्या जखमेमुळे हा आजार होतो, अशी माहिती तिने दिली आहे. यामागचं कारण म्हणजे कॅन्सरवरील उपचार किंवा ऑस्टियोपेनिया किंवा ठराविक इंजेक्शनचा दुष्परिणाम असू शकतो. सततच्या खोकल्यामुळेही हा आजार होऊ शकतो, असंही छवीन म्हटलंय.
छवीने सांगितलं की या आजारामुळे तिला श्वास घेताना, हातांची हालचाल करताना, झोपताना, बसताना आणि हसतानाही छातीत वेदना जाणवतात. अशा परिस्थितीतही छवीने आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचं ठरवलं आहे. तिने लिहिलं, ‘नाही, मी याविषयी नेहमीच सकारात्मक नसते. मात्र मी फार क्वचित नकारात्मक होते. मला जे ठिकाण सर्वाधिक आवडतं, ते म्हणजे जिममध्ये मी फार धाडसाने गेली. कारण आपण जेव्हा कधी खाली पडतो, तेव्हाच आपण उंच भरारीसाठी तयार होतो. सध्या तरी मी हेच करतेय.’ या पोस्टसोबत छवीने तिचा जिममधील फोटो पोस्ट केला आहे.
छवीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून काळजी व्यक्त होत आहे. अनेकांनी तिला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तर काहींनी तिच्या सकारात्मक दृष्टीकोनाचं कौतुक केलं आहे. एप्रिल महिन्यात छवीवर कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर बरी झाल्यानंतर छवीने कामालाही सुरुवात केली होती. जिममध्ये व्यायाम करतानाचेही फोटो तिने पोस्ट केले होते. छवीने आतापर्यंत ‘तीन बहुरानियाँ’, ‘तुम्हारी दृष्टी’, ‘घर की लक्ष्मी बेटियाँ’, ‘बंदिनी’ आणि ‘नागिन’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अशी ती अभिनेत्री आहे.