मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी जेव्हा ‘चांद्रयान 3’च्या ‘विक्रम लँडर’ने सॉफ्ट लँडिंग केलं, तेव्हा संपूर्ण देशभरातल्या नागरिकांनी जल्लोष केला. अमेरिका, चीन, रशिया या बलाढ्य देशांच्या कोट्यवधी डॉलर खर्चाच्या अनेक मोहिमांतूनही जे साध्य झालेलं नाही, ते अवघ्या 600 कोटी रुपयांत ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी साध्य करून दाखवलं. ‘चांद्रयान 3’ मोहिमेचा हा खर्च अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांपेक्षा कमी आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये या बजेटवरून चर्चा होऊ लागली. तेव्हा अनेकांनी ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा उल्लेख केला. जवळपास 700 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची खूप निराशा केली होती.
प्रभासची मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. 2023 या वर्षातील हा सर्वांत मोठा चित्रपट असल्याचं मानलं गेलं होतं. मात्र जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्यातील डायलॉग्स, व्हीएफएक्सची गुणवत्ता, कलाकारांचा लूक प्रेक्षकांच्या अजिबात पसंतीस पडला नाही. यावरून निर्माते, दिग्दर्शक आणि संवादलेखकाला जोरदार ट्रोल केलं गेलं. यासाठी संवादलेखक मनोज मुंतशीर यांनी प्रेक्षकांची माफीदेखील मागितली होती.
— Christopher Kanagaraj (@Chrissuccess) August 23, 2023
आता ‘चांद्रयान 3’ मोहिमेच्या बजेटवरून नेटकऱ्यांनी ‘आदिपुरुष’ला पुन्हा ट्रोल केलं आहे. ‘आदिपुरुष’ने त्यांच्या चित्रपटांचे पैसे शास्त्रज्ञांना द्यायला हवेत, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर 600 कोटी रुपयांमध्ये भारत देश चंद्रापर्यंत पोहोचला. मात्र 700 कोटी रुपयांच्या बजेटमध्येही ‘आदिपुरुष’ या चित्रपटाने निराशा केली, असं काहींनी लिहिलं आहे.
23 ऑगस्ट रोजी ‘चांद्रयान 3’च्या ‘विक्रम’ लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावार सॉफ्ट लँडिंग करताच कोट्यवधी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. बुधवारी संध्याकाळपासून संपूर्ण देशभरात याचा जल्लोष साजरा केला गेला.