बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार होऊन गेले, ज्यांचा मृत्यू आजही एक रहस्य बनून राहिला आहे. या यादीत सर्वांत पहिलं नाव येतं नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भारती. दिव्या भारतीच्या मृत्यूचं गूढ आजपर्यंत उकललं नाही. तिचा अखेरचा ‘लाडला’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र त्यापूर्वीच दिव्याचं निधन झालं. दिव्याने ‘लाडला’ या चित्रपटाची शूटिंग जवळपास 90 टक्के पूर्ण केली होती. मात्र तिच्या निधनानंतर चित्रपटासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. या चित्रपटाला बंद करण्याचाही सल्ला देण्यात आला होता. मात्र निर्मात्यांनी ‘लाडला’ चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरवलं होतं.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिव्याच्या जागी अभिनेत्री श्रीदेवी यांना भूमिकेची ऑफर दिली होती. श्रीदेवी यांनी ती ऑफर स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात झाली. श्रीदेवी आणि दिव्या यांच्यात बऱ्याच गोष्टी समान असल्याने त्यांना या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. चित्रपटात श्रीदेवी यांची एण्ट्री झाल्यानंतर पुन्हा सर्व सीन्स नव्याने लिहिण्यात आले होते.
श्रीदेवी यांनी जेव्हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली, तेव्हा सेटवर अशी भयंकर घटना घडली ज्यामुळे सर्वांचाच भीतीने थरकाप उडाला होता. ज्या डायलॉगच्या शूटिंगच्या वेळी दिव्या भारती अडखळली होती, त्याच डायलॉगच्या वेळी श्रीदेवी यासुद्धा अडखळल्या होत्या. काही घटनांची पुनरावृत्ती होताना पाहून सेटवरील इतर लोकसुद्धा थक्क झाले होते. जणू काही दिव्या भारती यांची आत्मा सेटवरच असल्याचा भास काहींना झाला होता. म्हणूनच त्यावेळी सेटवर सर्वांनी गायत्री मंत्राचा जाप करायला सुरुवात केली. नंतर नारळ फोडून सेटचं शुद्धीकरण केलं गेलं.
रवीना टंडनने या चित्रपटातील एका किस्सा सांगितला होता. “दिव्या, शक्ती कपूर आणि मी औरंगाबादमध्ये एका सीनचं शूटिंग करत होतो. या सीनमध्ये ती आम्हाला नोकरीवरून काढून टाकते. या सीनच्या शूटिंगदरम्यान दिव्या एका डायलॉगवर सतत अडखळत होती. यासाठी तिने बरेच रिटेकसुद्धा दिले होते. सहा महिन्यांनंतर जेव्हा श्रीदेवी यांनी दिव्याची जागा घेतली आणि आम्ही पुन्हा तोच सीन शूट करत होतो, तेव्हा श्रीदेवी यासुद्धा त्याच डायलॉगवर सतत अडखळत होत्या. हे पाहून आमच्या अंगावर काटाच आला होता”, असं रवीनाने सांगितलं होतं.