“घराचं नाव रामायण, मात्र लक्ष्मीला..”; सोनाक्षीच्या दुसऱ्या धर्मातील लग्नावरून कुमार विश्वास यांची टीका?

| Updated on: Dec 23, 2024 | 9:23 AM

2019 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सोनाक्षीला रामायणासंदर्भातील प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं. यावरून मुकेश खन्ना यांनी सोनाक्षी आणि तिच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर आता कुमार विश्वास यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

घराचं नाव रामायण, मात्र लक्ष्मीला..; सोनाक्षीच्या दुसऱ्या धर्मातील लग्नावरून कुमार विश्वास यांची टीका?
कवी कुमार विश्वास, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल आणि शत्रुघ्न सिन्हा
Image Credit source: Instagram
Follow us on

कवी कुमार विश्वास हे त्यांच्या दमदार कवितांसाठी ओळखले जातात. त्याचसोबत ते त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळेही चर्चेत असतात. विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते मोकळेपणे आपली मतं मांडतात. नुकताच उत्तरप्रदेशमधील मेरठमध्ये त्यांच्या कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते असं काही म्हणाले ज्याची आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ‘रामायणा’बद्दल त्यांनी हे वक्तव्य केलं असून अप्रत्यक्षपणे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा यांच्यावर निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी आणि रामायणाचा वाद चांगलाच चर्चेत आहे. ‘शक्तीमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांच्यानंतर आता कुमार विश्वास यांनी तिच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

नेमका काय आहे वाद?

2019 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या एका एपिसोडमध्ये सोनाक्षीला रामायणाशी संबंधित एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं. यावरून ‘शक्तीमान’ फेम मुकेश खन्ना यांनी वारंवार विविध मुलाखतींमध्ये सोनाक्षी आणि तिच्या संगोपनावरून प्रश्न उपस्थित केले. अखेर संयमाचा बांध सुटलेल्या सोनाक्षीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये भलीमोठी पोस्ट लिहित मुकेश खन्ना यांना सुनावलं. ‘पुढच्या वेळी माझ्या वडिलांनी माझ्यात जी मूल्ये रुजवली आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलायचं ठरवाल तेव्हा कृपया लक्षात ठेवा की त्या मूल्यांमुळेच मी आज अत्यंत आदराने हे सगळं बोलतेय,’ असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

कुमार विश्वास काय म्हणाले?

मेरठमधील कार्यक्रमात कुमार विश्वास म्हणाले, “आपल्या मुलांना सीताजींच्या बहिणींची नावं, भगवान रामाच्या भावंडांची नावं शिकवा, पाठ करायला लावा. एक संकेत देतोय, ज्यांना समजेल त्यांनी टाळ्या वाजवा. आपल्या मुलांना रामायण ऐकवा, गीता वाचायला लावा. अन्यथा असं न होवो की तुमच्या घराचं नाव तर रामायण असेल मात्र तुमच्या घरातील श्रीलक्ष्मीला कोणी दुसरा येऊन घेऊन जाईल.” शत्रुघ्न सिन्हा यांच्या घराचं नाव ‘रामायण’ असं आहे आणि त्यांची मुलगी सोनाक्षीने नुकतंच झहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्न केलंय. यावरूनच कुमार विश्वास यांनी दोघांवर निशाणा साधल्याचं म्हटलं जात आहे.