Lalbaugcha Raja | नितीन देसाईंच्या निधनानंतर ‘हे’ लोक बनवतायत लालबागचा राजाचा सेट; पैसे न घेता करतायत काम

| Updated on: Aug 30, 2023 | 7:57 PM

कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि लालबागचा राजा गणपतीचं एक वेगळंच कनेक्शन आहे. नितीन देसाई हे लालबागच्या राजाचे भक्त होते आणि 2009 पासून या गणपती मंडळाशी जोडले गेले होते.

Lalbaugcha Raja | नितीन देसाईंच्या निधनानंतर हे लोक बनवतायत लालबागचा राजाचा सेट; पैसे न घेता करतायत काम
मुंबईच्या ‘लालबागचा राजा’चं यंदा नव्वदावं वर्ष आहे.
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या कंपनीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ‘लालबागचा राजा गणपती’ मंडपाच्या सजावटीची जबाबदारी घेतली होती. मात्र मंडप पूर्ण होण्याआधीच नितीन देसाई यांनी कर्जत इथल्या त्यांच्या स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर लालबागचा राजाच्या मंडपाच्या सजावटीचं काम कोण पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित झाला. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. नितीन देसाई यांच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मंडपाला सजवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली आहे.

लालबागचा राजाच्या मंडपाचं काम सुरू

विशेष म्हणजे कोणताही पगार न घेता हे कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून मंडपाचं काम करत आहेत. ‘टीव्ही 9 हिंदी डिजिटल’शी बोलताना नाव न घेण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने सांगितलं, “नितीन सर आणि गणपती बाप्पाच्या सेवेसाठी आम्ही हे काम करत आहोत. आमच्यापैकी कोणी कधीच असा विचार केला नव्हता की नितीन सर इतक्या टोकाचं पाऊल उचलतील.”

हे सुद्धा वाचा

“गेल्या वर्षी नितीन दादाने म्हटलं होतं की ही माझी शेवटची कलाकृती असेल अन्..”

कर्मचाऱ्याने पुढे सांगितलं, “नितीन सरांना या जगाचा अखेरचा निरोप घेताना पाहून आम्हा सर्वांना खूप दु:ख झालं. त्यांनी कधीच कोणाचा पगार रोखला नव्हता. ते आम्हाला स्वत:च्या खिशातून पगार द्यायचे. सध्याची परिस्थिती आमच्यासाठी फार दु:खद आहे. आम्हाला त्यांची खूप उणीव जाणवते. आज आम्ही त्यांच्याशिवाय काम करतोय. खरंतर गेल्या वर्षी नितीन दादाने म्हटलं होतं की ही माझी शेवटची कलाकृती असेल आणि अखेर तसंच झालं.” मात्र या वृत्ताला अद्याप नितीन देसाई यांच्या कुटुंबीयांकडून कोणताच दुजोरा मिळाला नाही. तर दुसरीकडे लालबागचा राजाच्या मंडपाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे.

यंदाच्या वर्षीचं मंडप पूजन आणि सजावटीचा श्री गणेशा नितीन देसाई यांच्या हस्तेच

मुंबईच्या ‘लालबागचा राजा’चं यंदा नव्वदावं वर्ष आहे. या नव्वदाव्या वर्षीचं मंडप पूजन आणि सजावटीचा श्री गणेशा नितीन देसाई यांनीच केला होता. त्याचे खास फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. ‘लालबागच्या राजाचा विजय असो, लालबागच्या राजाचा विजय असो. लालबागच्या राजाच्या 90 व्या वर्षीच्या मंडप पूजन आणि सजावटीचा श्री गणेशा आज संपन्न झाला. गणपती बाप्पा मोरया,’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं होतं.