मुंबई : 29 नोव्हेंबर 2023 | अभिनेता सलमान खानला धमकी देणारी पोस्ट सोशल मीडियावर दिसल्यानंतर मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या सुरक्षेचा आढावा घेतला. सलमानला आधीच वाय प्लस (Y Plus) दर्जाची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून देण्यात आली होती. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली होती. रविवारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून फेसबुकवर धमकीची पोस्ट लिहिण्यात आली होती. ही पोस्ट पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालला उद्देशून होती. “तू सलमान खानला भाऊ मानतोस, पण आता वेळ आली आहे की तुझ्या भावाने समोर येऊन तुला वाचवावं”, अशी धमकी या पोस्टद्वारे देण्यात आली होती.
“हा संदेश सलमान खानसाठीही आहे. तुला दाऊद वाचवेल या भ्रमात राहू नकोस. तुला कोणीच वाचवू शकत नाही. सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर तू दिलेल्या नाट्यमयी प्रतिक्रियेकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं नाही. आम्हा सर्वांना ही गोष्ट माहीत आहे की तू व्यक्ती म्हणून कसा होता आणि त्याचे गुन्हेगारी संबंध कसे होते? तू आमच्या रडारवर आहेस. याला ट्रेलर असं समज, संपूर्ण चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. तुला ज्या देशात पळायचं असेल तिथे पळ पण एक गोष्ट लक्षात ठेव की मृत्यूला व्हिसाची गरज नसते. मृत्यू कोणत्याही आमंत्रणाशिवाय येऊ शकतो”, अशी धमकी या पोस्टमधून देण्यात आली आहे.
कॅनडामधील वॅनकॉवर इथल्या गिप्पी ग्रेवालच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. याची जबाबदारीसुद्धा बिश्नोईने घेतली आहे. या घटनेनंतर ग्रेवालने स्पष्ट केलं की सलमान त्याचा मित्र नाही. सलमानशी त्याची फक्त दोनदा भेट झाली होती. आता या धमकीच्या पोस्टनंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. “धमकीची पोस्ट कोणी लिहिली आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लिहिलं आहे. सोशल मीडिया अकाऊंट खरंच बिश्नोईचं आहे का, याचाही तपास सुरू आहे. इंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस शोधण्याचाही प्रयत्न करतोय”, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
नोव्हेंबर 2022 नंतर सलमानला वाय प्लस दर्जी सुरक्षा पुरविण्यात आली. इतकंच नव्हे तर खासगी पिस्तुल बाळगण्याचीही परवानगी सलमानला देण्यात आली आहे. याशिवाय सलमानने नवीन बुलेटप्रूफ गाडी खरेदी केली आहे.