मुंबई : ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा सिनेमा पुर्नप्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीकरीता मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. त्याचवेळी ‘द केरळ स्टोरी’ हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या समर्थनार्थ अनेकांनी प्रेक्षकांना मोफत तिकीटासह अल्पोपहाराची व्यवस्था केल्याचं निदर्शनास आलं. तसंच थिएटर्ससुद्धा समुहाने आरक्षित करण्यात आल्याचं दिसून आलं. द केरळ स्टोरीचा प्रसार आणि समर्थन अनेक राष्ट्रीय आणि स्थानिक राजकीय पक्षांनी सुद्धा केलं असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामूळे या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या सर्वच मराठी चित्रपटांना थिएटर्स आणि योग्य-शो ची वेळ मिळणं कठीण झालं आहे. अशा अनेक तक्रारी निर्मात्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. यामुळेच हा निर्णय घेतल्याचं समजतंय.
या काळात एकाचवेळी अनेक चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे जनतेच्या आवडीच्या वेळा आणि चित्रपटगृहे अनेक मराठी सिनेमांना उपलब्ध होऊ शकले नाहीत. शाळेच्या परीक्षा, काही शाळांना लागलेल्या सुटया त्याचप्रमाणे अनेक जण सुटयांमुळे देश-विदेश भ्रमण करीत असल्याने हा चित्रपट नंतर पुर्नप्रदर्शित करावा अशाही विनंत्या प्रेक्षकांकडून प्राप्त झाल्या होत्या. या सर्व बाबींचा परिणाम चित्रपच्या प्रदर्शनावर दिसून आला. असं असले तरी चित्रपटाचा दर्जा आयएमडीबीवर 8.7 आणि बुक माय शो वर 8.5 दिसून आला. त्याचप्रमाणे आजपर्यंतचा भारतातील शंभर टक्के निव्वळ नफा सामाजिक कार्यासाठी जाहीर करणारा हा एकमेव चित्रपट ठरला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर वर्तमानपत्रे, होर्डींग्ज, पोस्टर, स्टँडिज, प्रेस कॉन्फरन्स, रेडीओ इत्यादीवर मोठया प्रमाणात जाहीरात आणि प्रमोशन करणारा चित्रपट म्हणून उदयास आला आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात स्थान मिळवणारा आणि तरुणांना उत्तम मार्गदर्शन करणारा चित्रपट ठरला आहे. महाराष्ट्रातील जनतेने चित्रपट पाहील्यांनतरच्या आतापर्यंतच्या आलेल्या प्रतिक्रियांतून हे स्पष्ट झालं आहे. या सर्व बाबींचा विचार करुन सद्यस्थितीत चित्रपट पुनर्प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपट निर्माता शिवलाईन फिल्म्सचे संचालक प्रकाश बाविस्कर यांनी घेतल्याचं सहनिर्माता चंद्रकांत विसपूते यांनी कळविलं आहे. यानंतर राज ठाकरे यांना भेटून सद्यस्थितीबाबत चर्चा करुन योग्यवेळी पुनर्प्रदर्शन करण्याबाबतचा निर्णय तदनंतर घेणार असल्याचं सहनिर्माता चंद्रकांत विसपूते यांनी कळविलं आहे.