प्रसिद्ध तमिळ अभिनेता जयम रवी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या रायसोबत काम केलेल्या जयमने लग्नाच्या 15 वर्षांनंतर पत्नीला घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या घटस्फोटाच्या वृत्तादरम्यान गायिका आणि अध्यात्मिक मार्गदर्शिका केनिशा फ्रान्सिससोबत जयमच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. तेव्हा केनिशाने जयमची पत्नी आरती आणि तिच्या कुटुंबीयांवर आरोप केला. आरती आणि तिच्या कुटुंबीयांनी जयम रवीला खूप त्रास दिल्याचं तिने म्हटलं होतं. यावर आता पहिल्यांदाच आरतीने मौन सोडलं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने आपली बाजू मांडणारी मोठी पोस्टच लिहिली आहे. ‘माझ्या खासगी आयुष्याबद्दल होत असलेल्या सार्वजनिक चर्चेदरम्यान मी हे स्पष्ट करू इच्छिते की मौन हे दुबळ्या किंवा अपराधीपणाचं लक्षण नाही. जे मला वाईट ठरवण्याच्या प्रयत्नांमध्ये व्यग्र आहेत, त्यांच्यात गुंतण्यापेक्षा मी आदरपूर्वक मौन बाळगणं पसंत करेन’, असं तिने यात म्हटलंय.
‘माझ्या खासगी आयुष्याभोवती जी काही सार्वजनिकरित्या चर्चा सुरू आहे, त्याबद्दल मी बाळगलेलं मौन हे दुर्बलता किंवा अपराधीपणाचं लक्षण नाही. जे सत्य लपवण्याचा आणि मला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना प्रतिक्रिया न देता मी आदरपूर्वक मौन बाळगणं पसंत केलंय. न्याय मिळवून देण्यासाठी मला कायदेशीर प्रणालीवर विश्वास आहे. स्पष्टपणे सांगायचं झालं तर माझं याआधीचं वक्तव्य हे जाहीरपणे केलेल्या पोस्टसंदर्भात होतं. परस्पर संमतीने आम्ही हा निर्णय जाहीर केला असं त्यात म्हटलं गेलं होतं. माझ्यासाठी हे धक्कादायक होतं आणि त्यात एकतर्फी घटस्फोटाचा काहीच संदर्भ नव्हता. माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला गेला हे दुर्दैवी आहे. मला आजही त्या विषयावर खासगी चर्चेची आशा आहे, पण ती सतत नाकारली जातेय. मी विवाहाच्या पावित्र्याचा मनापासून आदर करते आणि कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या सार्वजनिक चर्चेत मी सहभागी होणार नाही. मला आमच्या कुटुंबाच्या कल्याणावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. मला मार्गदर्शन देणाऱ्या देवावर खूप विश्वास आहे’, अशा शब्दांत आरतीने भावना व्यक्त केल्या आहेत.
याआधी आरती तिच्या पतीबद्दल म्हणाली होती, “गेल्या काही काळापासून मी माझ्या पतीशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करतेय. आम्ही एकमेकांना आणि एकमेकांच्या कुटुंबीयांना जे वचन दिलं, त्याचा आदर करत मी त्याच्याशी मोकळेपणे बोलण्याचा प्रयत्न करतेय. पण दुर्दैवाने मला ती संधीही दिली जात नाहीये. त्याने मला आणि माझ्या मुलांना अंधारात ठेवून घटस्फोट जाहीर केला.” आरतीच्या या वक्तव्यानंतर जयमने घटस्फोटाचा निर्णय एकतर्फी घेतल्याची चर्चा सुरू झाली होती.
9 सप्टेंबर रोजी जयम रवीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित पत्नीला घटस्फोट देत असल्याचं जाहीर केलं होतं. त्याने ही घोषणा कोणतीच कल्पना न देता केल्याचा आरोप आरतीने केला होता. तर रवीने आरतीचे हे आरोप फेटाळले होते.