‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकलेली ऐश्वर्या राय तिच्या सौंदर्यामुळे आणि लूक्समुळे सतत चर्चेत असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्याचं खासगी आयुष्य सोशल मीडियावर चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेत असल्याचं म्हटलं जातंय. बच्चन कुटुंबीय आणि अभिषेकमुळे ऐश्वर्याने घटस्फोट घेण्याचं ठरवलंय, अशा चर्चांना उधाण आलंय. अशातच ऐश्वर्या तिच्या लूकमुळेही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. वाढलेल्या वजनामुळे आणि अजब फॅशनमुळे नेटकरी अनेकदा ऐश्वर्याला ट्रोल करतात. नुकताच तिने ‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये रॅम्प वॉक केला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा तिला वजनावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली.
ऐश्वर्याला डाएट करण्याती, जिमला जाण्याची खूप गरज आहे, असे सल्ले नेटकरी देऊ लागले. ऐश्वर्याने कधीच या ट्रोलिंगवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र ‘रेडिट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका युजरने तिच्या आरोग्याविषयी धक्कादायक दावा केला आहे. ‘रेडिट’ युजरने लिहिलेली ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. ऐश्वर्याला आरोग्याच्या काही समस्या असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
‘ऐश्वर्याला बॉडीशेम करू नका’ असं म्हणत या पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, ‘माझी मैत्रीण बॉलिवूडमध्ये काम करते आणि तिने मला सांगितलंय की गेल्या काही वर्षांपासून ऐश्वर्याला आरोग्याच्या काही समस्या जाणवत आहेत, ज्याबद्दलची माहिती मी इथे उघड करू शकत नाही. आरोग्याच्या या समस्यांमुळे ती कठोर डाएट किंवा इतर बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे वजन कमी करण्याची औषधं नाही घेऊ शकत. यामुळे तिला तिच्या दिसण्याबाबत खूपच संकोचलेपणा जाणवू लागला आहे.’
‘यात तिच्या स्टायलिस्ट्सचीही चूक नाही. ते फक्त तिचं म्हणणं ऐकतात कारण तिला तिच्या दिसण्याबाबत कोणतेच नवीन प्रयोग करायचे नाहीत. म्हणूनच ती अनेकदा विचित्र कपड्यांमध्ये दिसून येते, कारण तिला जास्तीत जास्त तिचं शरीर कपड्यांमध्ये लपवायचं असतं. लोकांचं लक्ष त्यावर केंद्रीत होऊ नये म्हणून ती असं करतेय. तिला आता स्लीव्हलेस कपडे घालण्याबद्दलही संकोचलेपणा वाटतो. ऐश्वर्याच्या हातात जे काही आहे, तेच करण्याचा प्रयत्न ती करतेय. बच्चन कुटुंबीयांमुळे नाही तर अभिषेकमुळे तिचं लग्न आधीच संकटात आलंय पण त्याविषयी मी आता बोलणार नाही. विश्वसुंदरी असूनही आपल्यात देशात तिला ज्याप्रकारे ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय, त्याच्या दबावाची मी कल्पनाही करू शकत नाही’, असंही पुढे म्हटलंय. या पोस्टने ऐश्वर्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.