बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या स्टारकिड्सचा जमाना आहे, असं म्हणायला हरकत नाही. सारा अली खान, जान्हवी कपूर, सुहाना खान, खुशी कपूर, अनन्या पांडे, शनाया कपूर यांसारखे स्टारकिड्स इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमावत आहेत. यापैकी काहींना पुरेसं यशसुद्धा मिळालं आहे. मात्र इंडस्ट्रीत असेही काही स्टारकिड्स आहेत, जे सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. अशीच एक स्टारकिड म्हणजे अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी निसा देवगण. निसाने अद्याप तिच्या करिअरची सुरुवात केली नाही, मात्र सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत येते. किंबहुना अनेकदा तिला ट्रोलिंगचाच सामना करावा लागतो. निसाला अनेकदा तिच्या मित्रमैत्रिणींसोबत पार्ट्यांमध्ये पाहिलं जातं. इतकंच काय तर पापाराझींनी शूट केलेल्या काही व्हिडीओंमध्ये ती नशेत धडपडतानाही दिसली होती. निसाचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये निसा तिच्या कारमध्ये बसून हसताना दिसतेय. तर पापाराझी तिचे फोटो आणि व्हिडीओ शूट करत आहेत. निसा अचानक हसू लागते आणि त्यावरूनच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘ही नेहमीच नशेत दिसते. तिचं हसणंही तसंच वाटतंय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘निसा नाही तर नशा देवगण असं तिचं नाव असायला पाहिजे’, असा टोमणा दुसऱ्या युजरने मारला. ‘प्रत्येक व्हिडीओमध्ये ती तोकड्या कपड्यांमध्ये आणि नशेत दिसते’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.
अजय आणि काजोल यांची मुलगी निसा ही 21 वर्षांची असून सध्या स्वित्झर्लंडमधील ग्लियॉन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये ती इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचं शिक्षण घेतेय. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत निसाचे वडील आणि अभिनेता अजय देवगण त्याच्या मुलांच्या ट्रोलिंगविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. “मी माझ्या दोन्ही मुलांना हेच समजावतो की सोशल मीडियावर लिहिलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. जेणेकरून त्यांना कोणता त्रास झाला नाही पाहिजे. मी त्यांना सांगतो की तुमच्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या तुलनेत तुम्हाला ट्रोल करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी असते.”
निसा तिच्या आईवडिलांप्रमाणेच अभिनय क्षेत्रात काम करणार का, या प्रश्नावर अजयने सांगितलं, “तिला या क्षेत्रात यायचंय की नाही हे मला माहीत नाही. सध्या तरी तिने अभिनयक्षेत्रात काही रस दाखवला नाही. पण तिचे विचार कधीही बदलू शकतात. ती सध्या परदेशी असून शिक्षणावर लक्ष केंद्रीत करतेय.”