मुंबई : गेल्या काही वर्षांत बॉलिवूड चित्रपटांना पायरसीचा मोठा फटका बसला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच ऑनलाइन लीक झाल्याने कलाविश्वातून संताप व्यक्त होतोय. पायरसीविरोधात कठोर नियम असूनही त्यावर अद्याप वचक बसला नाही. याचाच फटका आता अजय देवगणच्या चित्रपटालाही बसला आहे. रामनवमीनिमित्त अजयचा ‘भोला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला.
‘भोला’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अजय देवगणनेच केलं आहे. याआधी त्याने ‘यू मी और हम’, ‘शिवाय’ आणि ‘रनवे 34’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. आता ‘भोला’ हा चित्रपट लीक झाल्यानंतर निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. तमिलरॉकर्स, मूव्हीरुल्ज आणि टेलीग्राम यांसारख्या साइट्सवर फुल एचडी प्रिंटमध्ये हा चित्रपट लीक झाला आहे.
पायरसीच्या या मुद्द्यावर अजय देवगणनेही प्रतिक्रिया दिली आहे. अजयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत पायरसी करणाऱ्यांना टोला लगावला आहे. ‘पायरसी करने वाले शैतान नहीं, टिकट खरीद कर मूवी देखने वाले चट्टान बनो’, असं त्याने लिहिलंय. याआधीही बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना पायरसीचा फटका बसला आहे.
Piracy karne waale Shaitaan nahi, ticket khareed kar movie dekhne waale Chattaan bano! https://t.co/S1aV2DRmd4
— Ajay Devgn (@ajaydevgn) March 29, 2023
‘भोला’ हा तमिळ चित्रपट कैथीचा रिमेक आहे. त्यामुळे कैथीशी चित्रपटाची कथा फार मिळतीजुळती आहे. मात्र संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीचा विचार करत निर्मात्यांनी या चित्रपटात मनोरंजनाचा तडका लावत बरेच बदल केले आहेत. अजय देवगणने चित्रपटातील ॲक्शन सीन्सला नव्या अंदाजात सादर केले आहेत. या चित्रपटात अजय देवगणसोबतच तब्बू, आमला पॉल, दीपक डोब्रियाल, संजय मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाची कथा पोलीस अधिकारी डायना जोसेफ (तब्बू) आणि कैदी भोला (अजय देवगण) यांच्या अवतीभोवती फिरते.
19 मार्चपासून ‘भोला’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. खुद्द अजयने तब्बूसोबत व्हिडीओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली होती. यानंतर ‘भोला’च्या ॲडव्हान्स बुकिंगला जोरदार सुरुवात झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर दोन-तीन तासांतच आयमॅक्स आणि 4 डीएक्स व्हर्जनसह संपूर्ण देशात जवळपास 1200 तिकिटं विकली गेली होती. त्यामुळे या नऊ दिवसांत ॲडव्हान्स बुकिंगद्वारे दमदार कमाई झाल्याचं कळतंय.