मुंबई : अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. न्यासाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. मात्र सोशल मीडियावर अनेकदा ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. बॉलिवूडमधील इतर स्टारकिड्ससोबत कधी पार्ट्यांमध्ये तर कधी डिनर डेटला, न्यासाचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळतो. मात्र अनेकदा ती ट्रोलिंगची शिकार होते. सोशल मीडियावर न्यासा देवगणला खूप ट्रोल केलं जातं. त्यावर आता अजय देवगणने प्रतिक्रिया दिली आहे.
अजय सध्या त्याच्या आगामी ‘भोला’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या प्रमोशनिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अजयला न्यासाच्या ट्रोलिंगविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “मी माझ्या दोन्ही मुलांना हेच समजावते की ऑनलाइन लिहिलेल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे त्यांना कोणता त्रास झाला नाही पाहिजे. मी म्हणतो की तुमच्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या तुलनेत तुम्हाला ट्रोल करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी असते.”
“मला माहीत नाही की लोकांच्या मनात इतकी नकारात्मकता कुठून येते? आता मीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यास शिकलोय आणि मी माझ्या मुलांनाही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देतो. मला तर कधी कधी त्यांनी काय लिहिलंय हेसुद्धा समजत नाही. त्यामुळे मला आता त्या गोष्टींचा काहीच त्रास होत नाही”, असंही तो पुढे म्हणाला.
मुलांविषयी अजयने सांगितलं, “माझ्या मुलांवर नेहमीच लोकांच्या नजरा खिळलेल्या असतात आणि त्यामुळे मला जास्त चिंता वाटते. मी या गोष्टींना बदलू शकत नाही किंवा ट्रोलिंगला रोखूही शकत नाही. अनेकदा ट्रोलर्स असं काही लिहितात, ज्याची कल्पनासुद्धा केली जाऊ शकत नाही. पण आपण काय करू शकतो? जर मी त्याला उत्तर दिलं तर ते प्रकरण आणखी वाढेल.”
याआधी काजोलनेही एका मुलाखतीत ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली होती. “ट्रोलिंग हा सोशल मीडियाचा एक विचित्र भाग बनला आहे, असं मला वाटतं. सोशल मीडियावर 75 टक्के ट्रोलिंगच होत असते. तुम्ही ट्रोल झालात म्हणजे लोकांनी तुमची दखल घेतली. जर तुम्हाला ट्रोल केलं गेलं, म्हणजे तुम्ही प्रसिद्ध झालात. जोपर्यंत ट्रोल केलं जात नाही, तोपर्यंत तुम्ही प्रसिद्धच नाही, असं वाटतं”, अशी उपरोधिक प्रतिक्रिया काजोलने दिली होती.