मुंबई : अभिनेता अजय देवगणने एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला नुकताच प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार मिळाला. नाटू नाटूला माझ्यामुळेच ऑस्कर पुरस्कार मिळाला, असं वक्तव्य आता अजयने केलं आहे. आपल्या आगामी ‘भोला’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आला होता. यावेळी त्याने ऑस्करसंदर्भातील केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
RRR टीमच्या ऑस्कर विजयावर शुभेच्छा देत कॉमेडियन कपिल शर्मा म्हणतो, “RRR च्या नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण तुम्हीसुद्धा यात भूमिका साकारली आहे. अजय सरांची त्यात पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. तुम्ही कधी असा विचार केला होता का, की मी या चित्रपटात मी असेन आणि त्याला ऑस्कर पुरस्कार मिळेल?” त्यावर चेहऱ्यावर कोणतेही हावभाव न आणता अजय त्याला म्हणतो, “RRR ला जो ऑस्कर मिळाला आहे, तो माझ्यामुळेच मिळाला आहे. जर मी त्या गाण्यात नाचलो असतो, तर काय झालं असतं?” त्याचं हे वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.
पुढे कपिल म्हणतो, “तुम्हाला असं कधी वाटत नाही का, की खोलीचं दार बंद करून नाटू नाटूवर नाचावं?” त्यावर अजय उत्तर देतो, “तर मग ते ऑस्कर परत घेऊन गेले असते.” अजयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला. ‘नाटू नाटू’ हे 2022 मधील सर्वांत हिट गाण्यांपैकी एक आहे. एम. एम. किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी हे गाणं गायलं आहे. चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलं आहे.
RRR या चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. यामध्ये रामचरण, ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही भूमिका आहेत.