‘गुलीगत’ रीलस्टार ते ‘बिग बॉस मराठी 5’चं विजेतेपद पटकावण्यापर्यंतचा सूरज चव्हाणचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर यांना मागे टाकत सूरजने ‘बिग बॉस मराठी 5’ची ट्रॉफी आपल्या नावे केली. रविवारी 6 ऑक्टोबर रोजी हा अंतिम सोहळा पार पडला. बारामतीच्या सूरजने मिळवलेल्या या विजयानंतर सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. कलाक्षेत्रातील सेलिब्रिटींसोबतच राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनीही सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर सूरजसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
‘आमच्या बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सूरजनं हे यशोशिखर गाठलं आहे. सूरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सूरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,’ अशी त्यांनी पोस्ट लिहिली आहे.
आमच्या बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सुरजनं हे यशोशिखर गाठलं आहे. सुरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा… pic.twitter.com/HqX8atrEYV
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 6, 2024
बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा सूरजसाठी पोस्ट लिहिली आहे. ‘कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू असलेल्या बिग बॉस या रिॲलिटी शोमध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळवलं. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचं या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो’, असं त्यांनी लिहिलंय.
‘बिग बॉस मराठी 5’मध्ये गायक अभिजीत सावंत दुसऱ्या क्रमांकावर होता, तर निक्की तांबोळी तिसऱ्या स्थानी राहिली. धनंजय पोवार चौथ्या क्रमांकावर आणि अंकिता वालावलकर पाचव्या स्थानी होती. बिग बॉसच्या ट्रॉफीसोबतच विजेता सूरज चव्हाणला 14.6 लाख रुपये कॅश प्राइज मिळाली. इतकंच नव्हे तर त्याला 10 लाख रुपयांचं ज्वेलरी वाऊचर आणि एक बाईकसुद्धा मिळाली.