गाझियाबाद : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येप्रकरणी गायक समर सिंहला वाराणसी पोलिसांनी गाझियाबाद इथून अटक केली. समरवर आकांक्षाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आकांक्षाच्या आत्महत्येनंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. 26 मार्च रोजी आकांक्षा वाराणसीच्या सारनाथ भागातील एका हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. तिने आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. मात्र आकांक्षा आईने समर आणि त्याचा भाऊ संजय सिंहविरोधात तक्रार दाखल केली होती.
आकांक्षा दुबे आणि समर सिंह हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, असं म्हटलं जात आहे. समरच्या अटकेनंतर आता पोलीस त्याचा भाऊ संजयचा शोध घेत आहेत. वाराणसीहून आलेल्या पोलिसांच्या एका पथकाने मध्यरात्री 12 वाजता समरला अटक केल्याची माहिती गाझियाबादच्या एसपींनी दिली. अटकेपासून वाचण्यासाठी समर सिंह हा नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोसायटीमध्ये लपून बसला होता. त्याच्याविरोधात कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समर सिंह आणि संजय सिंह यांच्यावर हिंसाचार भडकावल्याचा आरोप झाल्यानंतर गुरुवारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. त्यापूर्वी वकील शशांक शेखर त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या मागणीसाठी पत्र लिहिलं होतं. आकांक्षाने तिच्या हॉटेल रुममध्ये आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं. आकांक्षाची आई मधू दुबे यांच्या बाजूने वकील त्रिपाठी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अनेक मुद्दे मांडत अभिनेत्रीच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच अंत्यसंस्कार व्हावेत, असा आईचा आग्रह असतानाही आकांक्षाच्या पार्थिवावर बळजबरीने अंत्यसंस्कार करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.
आकांक्षाने ‘व्हॅलेंटाइन डे’ला तिच्या रिलेशनशिपचा खुलासा केला होता. समर सिंहसोबतचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र आत्महत्येच्या काही दिवस आधी या दोघांचं ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअपमुळे ती नैराश्याचा सामना करत होती, असं पोलीस म्हणाले होते. मधू दुबे यांनी समर सिंह आणि त्यांचा भाऊ संजय सिंहविरोधात एफआयआर दाखल केली होती.
आकांक्षा दुबे तीन वर्षांची असतानाच आईवडिलांसोबत मुंबईत राहायला आली होती. तिने आयपीएस अधिकारी व्हावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती. मात्र आकांक्षाला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयात रस होता. आकांक्षाचा जन्म 21 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तरप्रदेशमधल्या मिर्झापूरमध्ये झाला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तर आकांक्षाचे टिकटॉक व्हिडीओसुद्धा तुफान व्हायरल झाले होते. भोजपुरी इंडस्ट्रीची ड्रीम गर्ल या नावाने ती ओळखली जायची.