उत्तर प्रदेश : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने 26 मार्च रोजी वाराणसीमधल्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्याठिकाणी ती शूटिंगसाठी गेली होती. अवघ्या 25 व्या वर्षी तिने टोकाचं पाऊल उचललं. आकांक्षाच्या रुममधून कोणतीच सुसाइड नोट मिळाली नव्हती. उत्तर प्रदेशचे पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. आकांक्षाच्या मृत्यूप्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. आकांक्षाने ज्या रात्री आत्महत्या केली, त्यावेळी तिच्यासोबत एक व्यक्ती तिच्या हॉटेल रुममध्ये आली होती. ती व्यक्ती आकांक्षाच्या हॉटेल रुममध्ये 17 मिनिटं होती. पोलीस सध्या त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे आकांक्षाचा पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा पोलिसांच्या हाती आला आहे. आकांक्षाचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाला, अशी माहिती पोलीस आयुक्त संतोष सिंह यांनी दिली. तिच्या शरीरावर कोणत्याच खुणा आढळल्या नाहीत.
आकांक्षाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. आकांक्षाची आई मधू दुबे यांनी भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांना दोषी ठरवलं आहे. समर आणि आकांक्षा हे एकमेकांना डेट करत होते. फेब्रुवारी महिन्यात आकांक्षाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर समरसोबतचा फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं होतं. 21 मार्च रोजी समरचा भाऊ संजयने आकांक्षाला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप मधू यांनी केला आहे.
पोलीस सध्या समर सिंह आणि संजय सिंहच्या शोधात आहेत. यासाठी त्यांनी टीम बनवल्या असून वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा शोध सुरू आहे. त्याचप्रमाणे आकांक्षासोबत तिच्या हॉटेल रुममध्ये गेलेली व्यक्ती कोण होती, याचं ठोस उत्तर अद्याप पोलिसांनी दिलं नाही. हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती हॉटेल स्टाफने दिली.
आकांक्षा दुबे तीन वर्षांची असतानाच आईवडिलांसोबत मुंबईला राहायला आली. तिने आयपीएस अधिकारी व्हावं अशी तिच्या पालकांची इच्छा होती. मात्र आकांक्षाला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयात रस होता. आकांक्षाचा जन्म 21 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तरप्रदेशमधल्या मिर्झापूरमध्ये झाला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तर आकांक्षाचे टिकटॉक व्हिडीओसुद्धा तुफान व्हायरल झाले होते. भोजपुरी इंडस्ट्रीची ड्रीम गर्ल या नावाने ती ओळखली जायची.
मेरी जंग मेरा फैसला या चित्रपटातून आकांक्षाने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘मुझसे शादी करोगी’ (भोजपुरी), वीरों के वीर, फायटर किंग, कसम पैदा करने की 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.