मुंबई | 20 जुलै 2023 : मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. तिथल्या हिंसाचाराचा भयानक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला. महिलांना विवस्त्र फिरवलं जात असून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा हा व्हिडीओ अत्यंत त्रासदायक आणि हादरवून सोडणारा आहे. या व्हिडीओमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. अखेर गुरुवारी अभिनेता अक्षय कुमारने यावर मौन सोडलं. मणिपूर हिंसाचाराबद्दल बोलणारा अक्षय पहिलाच बॉलिवूड सेलिब्रिटी ठरला आहे. अक्षयने गुरुवारी ट्विट करत मणिपूरमधील परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
अक्षयने ट्विटमध्ये लिहिलं, ‘मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून मी हादरलो. दोषींना इतकी कठोर शिक्षा मिळावी की पुन्हा असं भयानक कृत्य करण्याचा कोणी विचारही करणार नाही अशी मी अपेक्षा करतो.’ अक्षयच्या या ट्विटरवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘अखेर कोणीतरी व्यक्त झालं’, असं एकाने लिहिलं. तर ‘फाशीची शिक्षा हाच एकमेव मार्ग आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. मणिपूरमधील हिंसाचारावर इतके दिवस मौन का बाळगलंस आणि या ट्विटमध्ये कोणालाही टॅग का केलं नाहीस, असाही सवाल अनेकांनी अक्षयला यावेळी केला.
Shaken, disgusted to see the video of violence against women in Manipur. I hope the culprits get such a harsh punishment that no one ever thinks of doing a horrifying thing like this again.
— Akshay Kumar (@akshaykumar) July 20, 2023
मे महिन्यात कुकी जमात आणि मेईती समुदायातील संघर्षानंतर मणिपूरमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली. ही हिंसा दिवसागणिक तिथे वाढतच गेली. अनुसूचित जमातीच्या यादीत कुकी जमातीचा समावेश करावा, सरकारी नोकऱ्या आणि महाविद्यालयांमध्ये समाजाला विशेष आरक्षण मिळावं तसंच इतर अनेक फायदे या मागण्यांवरून हा संघर्ष सुरू झाला.
संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून (गुरुवार) सुरू होत असून मणिपूरमधील हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहांमध्ये स्पष्टीकरण देण्याची मागणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी केली आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्याचं आश्वासन केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीत दिलं आहे. तीन महिन्यांनंतरही मणिपूरमधील संघर्ष थांबलेला नाही. या गंभीर मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी एकदाही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे या मुद्द्यावर लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली जाईल, असं काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं.