मुंबई : गेल्या वर्षापासून अभिनेता अक्षय कुमारला बॉलिवूडमध्ये कठीण काळाचा सामना करावा लागतोय. कारण त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर विशेष प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या वर्षभरात बच्चन पांडे, रक्षाबंधन, सम्राट पृथ्वीराज आणि राम सेतू हे त्याचे चार चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. तर ‘कटपुतली’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. मात्र या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांचा अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. एकानंतर एक त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय कुमार या अपयशाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.
प्रेक्षक-समीक्षकांकडून होणाऱ्या टीकांविषयी त्याला या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “माझ्या आयुष्यात मी बरेच चढउतार पाहिले आहेत. या सर्वांत एक सर्वसामान्य गोष्ट म्हणजे जेव्हा सर्वकाही चांगलं सुरू असतं, तेव्हा कौतुकाचा वर्षाव होत असतो. पण जेव्हा चांगला काळ नसतो, तेव्हा तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही इतकी टीका होत असते.”
“होय, मी सुद्धा माणूसच आहे. चांगल्या गोष्टी मलासुद्धा चांगल्या वाटतात आणि वाईट गोष्टींचा माझ्यावरही परिणाम होतो. मला माझ्यातील एक गुण मला खूप आवडतो तो म्हणजे मी लगेच पुढे निघून जातो. जेव्हा मी इंडस्ट्रीत काम सुरू केलं होतं, तेव्हा माझ्या मनात जी भावना होती, तीच भावना मला आता पुढे जाण्यास फार मदत करते. ती भावना म्हणजे कामाची प्रचंड आवड. ही गोष्ट माझ्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हाला फक्त पुढे चालत राहावं लागतं, यात दुसरा कोणताच मार्ग नाही. तुमची मेहनत आणि तुमचं काम एका सर्वोच्च शक्तीकडून कायम पाहिलं जातं आणि त्याचा मोबदलासुद्धा तुम्हाला मिळतो. हाच विचार करून मी पुढे जातो”, असं त्याने पुढे सांगितलं.
बॉक्स ऑफिसवर चित्रपट अपयशी ठरल्यास त्याचा त्रास होतो का, असा प्रश्न त्याला पुढे विचारण्यात आला. त्याचं उत्तर देताना अक्षय म्हणाला, “अर्थातच, मला त्रास होतो. बॉक्स ऑफिसच्या आकड्यांमुळेच आम्ही हिरो किंवा झिरो ठरतो. यालाच तुम्ही हिट किंवा फ्लॉप म्हणता. आम्ही योग्य आहोत की चुकतोय हे हे प्रेक्षकच आम्हाला सांगतात. हेच सर्व बॉक्स ऑफिसच्या आकड्यांमध्ये झळकतं. जर एखादा चित्रपट चांगला चालला नाही म्हणजे लोक तो पहायला आले नाहीत. त्याचाच अर्थ असा होतो की लोकांना तो चित्रपट आवडला नाही. असं जेव्हा घडतं, तेव्हा तुम्हाला बदलण्याची गरज असते. माझ्या मते संपूर्ण इंडस्ट्री सध्या हाच प्रयत्न करतेय.”