मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : अभिनेता अक्षय कुमारला त्याच्या कॅनेडियन नागरिकत्वावरून अनेकदा टीकेचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर त्याला ‘कॅनडा कुमार’ म्हणूनही ट्रोल केलं गेलं. जवळपास तीन वर्षांपूर्वी अक्षयने सांगितलं होतं की तो लवकरच भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करणार आहे. यानंतर अनेकदा त्याला नागरिकत्वावरून प्रश्न विचारण्यात आला होता. अखेर स्वातंत्र्यदिनानिमित्त अक्षयने त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर त्याला भारताचं नागरिकत्व मिळालं आहे. सोशल मीडियावर त्याने याचा फोटो पोस्ट केला आहे. ‘हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही हिंदुस्तानी’, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
अक्षयने सोशल मीडियावर भारतीय नागरिकत्वाची कागदपत्रे हातात घेतलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही हिंदुस्तानी. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. जय हिंद’. त्याने हा फोटो पोस्ट करताच त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘मनाने तू हिंदुस्तानी होताच, पण आज त्यावर शिक्कामोर्तब लागला,’ असं एकाने म्हटलं. तर ‘स्वातंत्र्यदिनानिमित्त चांगलं सरप्राइज दिलंस’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.
याआधी जेव्हा जेव्हा अक्षयला त्याच्या नागरिकत्वावरून प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा त्याने त्याचं मोकळेपणे उत्तर दिलं होतं. “भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी जे काही कमावलं आणि मला जे काही मिळालं ते सर्व इथूनच मिळालं. मी नशीबवान आहे की मला त्याची परतफेड करायचीही संधी मिळाली. जेव्हा कोणतीच माहिती नसताना लोक तुमच्याविषयी बोलतात तेव्हा खूप वाईट वाटतं”, असं तो एका मुलाखतीत म्हणाला होता.
वर्षभरात चार ते पाच चित्रपट करणाऱ्या अक्षयला एकेकाळी बॉलिवूडमध्ये चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. 1990 च्या काळात त्याने जवळपास 15 हून अधिक फ्लॉप चित्रपट दिले होते. चित्रपटांना यश मिळत नसल्याने त्याने कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. “मी विचार केला की इथे माझे चित्रपट चालत नाहीयेत आणि मला काम करणं गरजेचं होतं. मी कॅनडाला कामासाठी गेलो होतो. माझा मित्र तिथे राहत होता आणि त्याने मला कामासाठी तिथे बोलावून घेतलं होतं. त्यावेळी मी कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि तो मला मिळाला”, असं अक्षयने स्पष्ट केलं होतं.
“माझे फक्त दोन चित्रपट प्रदर्शित व्हायचे होते आणि सुदैवाने ते दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. माझा मित्र म्हणाला की तू पुन्हा भारतात जा आणि अभिनयाला सुरुवात कर. त्यानंतर मला आणखी काही चित्रपटांचे ऑफर्स मिळाले आणि मी पुन्हा इंडस्ट्रीत काम करू लागलो. माझ्याकडे पासपोर्ट आहे हे मी विसरलोच होतो. हा पासपोर्ट बदलावा याचा विचार मी कधी केला नव्हता. पण आता मी त्यासाठी अर्ज केला आहे”, असं अक्षयने सांगितलं होतं.
लोकसभा निवडणुकीपूर्वी एप्रिल 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीनंतर अक्षय कुमारचं नागरिकत्व चर्चेचा विषय ठरला होता. तेव्हाही अक्षयने नागरिकत्वाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती. “माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याने मी इतरांपेक्षा कमी भारतीय ठरत नाही. मी भारतीयच आहे. मी गेल्या नऊ वर्षांपासून इथे आहे. होय, मी 2019 मध्ये म्हटलं होतं की मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला होता आणि नंतर कोरोना महामारी आली. त्यामुळे दोन-अडीच वर्षे सर्व गोष्टी बंद पडल्या”, असं तो म्हणाला होता.