उज्जैन | 9 सप्टेंबर 2023 : अभिनेता अक्षय कुमार आज (शनिवार) त्याचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त अक्षय उज्जैनमधल्या श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत मुलगा आरव, बहीण अलका हिरानंदानी आणि भाची सिमरसुद्धा होते. त्या तिघांसोबत अक्षयने नंदी हॉलमध्ये बसून महाकालचं दर्शन घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी भस्म आरतीमध्येही सहभाग घेतला. यावेळी अक्षय कुमारसोबत क्रिकेटर शिखर धवनसुद्धा दिसला.
आपल्या वाढदिवसानिमित्त अभिनेता अक्षय कुमार उज्जैनमधल्या जगप्रसिद्ध बाबा महाकालेश्वर मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत मुलगा आरव, बहीण अलका आणि भाची सिमरसुद्धा होती. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अक्षय कुमार या मंदिरात पोहोचला. त्याच्यासोबत क्रिकेटर शिखर धवनसुद्धा होता. मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमारने महाकाल मंदिराचा संपूर्ण नंदी हॉल बुक केला होता. भस्म आरतीदरम्यान त्याने भगवे वस्त्र परिधान केले होते. तर अक्षयची बहीण अलकानेही भगव्या रंगाची साडी नेसली होती. भस्म आरतीदरम्यान या सर्वांनी नंदी हॉलमध्ये बसून शंकराचा जाप केला. त्यानंतर पुजारी आशिष शर्मा यांच्या माध्यमातून त्यांनी शिवलिंगवर जल अर्पण केलं.
पंडित आशिष शर्मा यांनी सांगितलं की अक्षय कुमारने महाकालेश्वर मंदिराबद्दल बरंच काही जाणून घेतलं. या मंदिराविषयी बरीच माहिती घेऊन तो इथून निघाला. तर दुसरीकडे वाढदिवशी महाकालेश्वरचं दर्शन मिळाल्याबद्दल अक्षयनेही कृतज्ञता व्यक्त केली. वाढदिवशी यापेक्षा सर्वात मोठी भेट अजून काय असू शकते, असं तो म्हणाला. भस्म आरतीनंतर अक्षयने तिथल्या पत्रकारांशी संवाद साधला. “आपला देश पुढे जातोय. बाबा महाकालेश्वरचा आशीर्वाद सर्वांवर राहू दे. त्यांनी आम्हाला इथं बोलावलं आणि त्यांचा आशीर्वाद दिला,” असं अक्षय म्हणाला. यावेळी शिखर धवनने आगामी सामन्यात भारताचा पाकिस्तानवर विजय होऊ दे अशी इच्छा बोलून दाखवली. त्यावर अक्षय कुमार मस्करीत म्हणाला, “या फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्या सहज मिळून जातील. महाकालेश्वरकडून तर देशाची प्रगती मागितली जाते.”