लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय. सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. विशेष म्हणजे अभिनेता अक्षय कुमारने यंदा पहिल्यांदाच भारतात मतदान केलं आहे. 56 वर्षीय अक्षयने याआधी कोणत्याच निवडणुकीत भारतात मतदान केलं नव्हतं. आता लोकसभा निवडणुकीदरम्यान सकाळी सकाळी रांगेत उभं राहून त्याने मतदान केलं. यामागचं कारण म्हणजे अक्षयकडे याआधी भारताचं नागरिकत्वच नव्हतं. त्याच्याकडे कॅनेडियन नागरिकत्व होतं आणि त्यामुळे अनेकदा त्याला टीकेचा सामना करावा लागला होता. सोशल मीडियावर त्याला ‘कॅनडा कुमार’ म्हणूनही ट्रोल केलं जायचं. अखेर गेल्या वर्षी त्याला भारताचं नागरिकत्व मिळालं. त्यानंतर आता त्याने पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला आहे.
अक्षय कुमार मतदान करण्यासाठी रांगेत उभा राहिला तेव्हा त्याची प्रतिक्रिया ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेकडून जाणून घेण्यात आली. मतदानासाठी रांगेत उभं राहावं लागतंय, त्यामुळे तुला कसं वाटतंय असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “मग मी काय करू? रांग मोडून पुढे जाऊ का?” यानंतर मतदान करून आल्यानंतर बोटावरची शाई दाखवत तो म्हणाला, “मला खूप चांगलं वाटतंय. मी पहिल्यांदाच मतदान केलंय.”
#WATCH | Actor Akshay Kumar shows the indelible ink mark on his finger after casting his vote at a polling booth in Mumbai.
He says, “…I want my India to be developed and strong. I voted keeping that in mind. India should vote for what they deem is right…I think voter… pic.twitter.com/mN9C9dlvRD
— ANI (@ANI) May 20, 2024
वर्षभरात चार ते पाच चित्रपट करणाऱ्या अक्षयला एकेकाळी बॉलिवूडमध्ये चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. 1990 च्या काळात त्याने जवळपास 15 हून अधिक फ्लॉप चित्रपट दिले होते. चित्रपटांना यश मिळत नसल्याने त्याने कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. “मी विचार केला की इथे माझे चित्रपट चालत नाहीयेत आणि मला काम करणं गरजेचं होतं. मी कॅनडाला कामासाठी गेलो होतो. माझा मित्र तिथे राहत होता आणि त्याने मला कामासाठी तिथे बोलावून घेतलं होतं. त्यावेळी मी कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि तो मला मिळाला”, असं अक्षयने स्पष्ट केलं होतं.
“माझे फक्त दोन चित्रपट प्रदर्शित व्हायचे होते आणि सुदैवाने ते दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. माझा मित्र म्हणाला की तू पुन्हा भारतात जा आणि अभिनयाला सुरुवात कर. त्यानंतर मला आणखी काही चित्रपटांचे ऑफर्स मिळाले आणि मी पुन्हा इंडस्ट्रीत काम करू लागलो. माझ्याकडे पासपोर्ट आहे हे मी विसरलोच होतो. हा पासपोर्ट बदलावा याचा विचार मी कधी केला नव्हता. पण आता मी त्यासाठी अर्ज केला आहे”, असं अक्षयने सांगितलं होतं.
लोकसभा निवडणुकीपूर्वी एप्रिल 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीनंतर अक्षय कुमारचं नागरिकत्व चर्चेचा विषय ठरला होता. तेव्हाही अक्षयने नागरिकत्वाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती. “माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याने मी इतरांपेक्षा कमी भारतीय ठरत नाही. मी भारतीयच आहे. मी गेल्या नऊ वर्षांपासून इथे आहे. होय, मी 2019 मध्ये म्हटलं होतं की मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला होता आणि नंतर कोरोना महामारी आली. त्यामुळे दोन-अडीच वर्षे सर्व गोष्टी बंद पडल्या”, असं तो म्हणाला होता.