पाठकबाईंचं 4-5 वर्षांनंतर मालिकेत कमबॅक; म्हणाली “इंडस्ट्रीची मम्मा आता..”

| Updated on: Dec 23, 2024 | 10:59 AM

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत पाठकबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधर आता चार ते पाच वर्षांनंतर एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचं नाव 'लक्ष्मी निवास' असं आहे.

पाठकबाईंचं 4-5 वर्षांनंतर मालिकेत कमबॅक; म्हणाली इंडस्ट्रीची मम्मा आता..
अभिनेत्री अक्षया देवधर
Image Credit source: Instagram
Follow us on

प्रेक्षकांमध्ये ‘पाठकबाई’ म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री अक्षया देवधर लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतून अक्षया पुनरागमन करतेय. यामध्ये ती भावनाची भूमिका साकारतेय. या नवीन भूमिकेबद्दल अक्षयाने आनंद व्यक्त केला आहे. “मालिकेतील भावना ही अत्यंत भावनिक मुलगी आहे. आई-वडिलांना समजून घेणारी, सगळ्यांना आपलंसं करणारी, थोडी कमी बोलणारी आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी असलेली, अशी आहे भावना. परंतु पत्रिकेत असणाऱ्या दोषांमुळे तिचं लग्न जुळत नाही. अनेक वर्ष प्रयत्न करूनही लग्न जुळत नसल्याने ती आयुष्यात उदास आहे. आपण घरच्यांवर ओझं आहोत किंवा आपल्या आई – वडिलांना आपल्यामुळे त्रास होतोय, अशी भावना तिच्या मनात आहे”, असं ती सांगते.

या भूमिकेच्या निवडीविषयी अक्षया पुढे म्हणाली, “मला निर्मात्यांचा फोन आला आणि त्यांनी झी मराठीसाठी ऑडिशन असल्याचं सांगितलं. मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मला चार-पाच वर्षांनंतर पुन्हा झी मराठीवर काम करायला मिळतंय. त्यातून एक वेगळी भूमिका, कौटुंबिक गोष्ट ऐकून खूप छान वाटलं. टीमही प्रचंड मोठी आहे. हर्षदा खानविलकर, तुषार दळवी आणि इतर पात्र या सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम करणार आहे. पुन्हा सेटवर माझं एक नवीन कुटुंब होणार आहे आणि या सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळणार आहे त्याची उत्सुकता वेगळीच आहे. मी हर्षदाताईला खूप वर्षांपासून ओळखते. पण तिच्यासोबत काम करण्याची कधी संधी आली नव्हती म्हणून छान वाटतं. या मालिकेत ती माझ्या आईच्या भूमिकेत आहे. ती इंडस्ट्रीची मम्मा आहेच, पण आता ती माझीही आई होणार आहे तर छान वाटतंय.”

हे सुद्धा वाचा

“पहिल्या दिवशी जेव्हा प्रोमो शूट करण्यात आला, तेव्हा नवीन माणसांसोबत काम करण्याचा आनंद आणि दडपण होतं. नवीन मालिकेत आपण कसं दिसणार, प्रोमो कसा होईल याचीही उत्सुकता सगळ्यांमध्ये होती. मला दडपण होतं, कारण मी चार ते पाच वर्षांनंतर पुन्हा मालिकेत काम करणार आहे. माझा लूक काय असेल, मी कशी दिसणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूमिका जशी लेखकाने लिहिली आहे, तशीच ती प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची आहे हे दडपण आहेच. भावनाच्या लूकबद्दल सांगायचं झालं तर तिच वय 30 आहे. ती साधी, सरळ, सोज्वळ आहे. मी स्वतः ला कधी वेणीमध्ये बघितलं नाहीये. पण यात वेणी, तिच्या साड्या, तिचे ड्रेस सगळंच लोकांना आवडेल. या मालिकेमुळे लोकांवर खूप छान परिणाम होईल असं वाटतंय. कारण वेगळ्या धाटणीची मालिका आहे. प्रत्येक भूमिका सुंदर आहे. प्रत्येक पात्रावर ही मालिका अवलंबून आहे. हाताची बोटं सारखी नसतात तशीच एका घरातील माणसं सारखी नाहीत. परंतु ती माणसं एकत्र आल्याशिवाय हातामधे बळ येत नाही. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत बरीच पात्र आहेत. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. जेव्हा ती एकत्र येतात तेव्हा काय घडतं हे या गोष्टीतून लोकांना समजेल. कुटुंब आणि नाती किती महत्त्वाची आहेत, हे या मालिकेतून लोकांपर्यंत पोहोचेल”, अशी प्रतिक्रिया अक्षयाने दिली. झी मराठीची ही नवीकोरी मालिका ‘लक्ष्मी निवास’ 23 डिसेंबरपासून दररोज रात्री 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.