मुंबई: अभिनेत्री आलिया भट्टने 6 नोव्हेंबर रोजी मुलीला जन्म दिला. रणबीर कपूर आणि आलियाची मुलगी आता एक महिन्याची झाली आहे. महिनाभरानंतर पहिल्यांदाच आलियाची प्रतिक्रिया समोर आली आहे. रणबीर आणि आलियाने त्यांच्या मुलीचं नाव ‘राहा’ असं ठेवलंय. राहाच्या जन्मानंतर दिलेल्या पहिल्या मुलाखतीत आलिया मातृत्वाबद्दल व्यक्त झाली. काही दिवसांपूर्वीच आलिया तिच्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त पापाराझींसमोर दिसली होती. यावेळी रणबीर आणि आलियाने मिळून फोटोसाठी पोझ दिले होते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलिया म्हणाली, “अवघ्या काही दिवसांत मातृत्वाच्या भावनेनं माझ्यात खूप काही बदल आणले आहेत. आता फक्त महिनाच झाला आहे. तीन आठवड्यांहून अधिक.. पण या भूमिकेचा माझ्या कोणत्याही भूमिकेच्या निवडीवर कसा परिणाम होईल हे मला माहीत नाही. कारण मी अद्याप याबद्दल विचार केलेला नाही.”
आई झाल्यानंतर चित्रपटांच्या निवडीवर काही परिणाम होईल का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ती पुढे म्हणाली, “ही गोष्ट माझ्या दृष्टीकोनालाही बदलणारी आहे. पहिल्यापेक्षा आता माझं मन खूप मोकळं झालंय असं मला वाटतं. मला माहीत नाही की काय बदल होतील, पण पुढे काय होईल हे पहायला मला आवडेल. या प्रवासासाठी मी खूपच उत्सुक आहे.”
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने याचवर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. 14 एप्रिल 2022 रोजी मुंबईतील राहत्या घरीच या दोघांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या सात महिन्यांतच आलियाने मुलीला जन्म दिला.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. 2018 मध्ये या दोघांनी पहिल्यांदा जेव्हा एकत्र सोनम कपूरच्या लग्नाला हजेरी लावली, तेव्हा त्यांच्या डेटिंगची चर्चा सुरू झाली. जवळपास सहा-सात वर्षे डेट केल्यानंतर रणबीर-आलियाने या वर्षी एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधली.